सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना निकृष्ट आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:18 PM2020-05-25T12:18:34+5:302020-05-25T12:19:07+5:30
रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरवासीयांमध्ये कोरोना विषाणूची धास्ती निर्माण झाली असतानाच आता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी गठित केलेल्या आहार समितीचे अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यावर आहारात सुधारणा करण्याचे निर्देश देण्याची वेळ आली आहे.
शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, आज रोजी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांनी चक्क ३८७ चा आकडा गाठला आहे. ही आकडेवारी प्रशासकीय यंत्रणांच्या कर्तव्यदक्ष कारभाराची पोलखोल करण्यास पुरेशी आहे. दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणांचा अत्यंत उदासीन व गलथान कारभारही रुग्णांच्या वाढत्या संख्येला कारणीभूत ठरू लागला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या वॉर्डात जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्यावतीने मूलभूत सुविधांची पूर्तता केली जात नसल्याचा आक्षेप यापूर्वी अनेकदा नोंदविण्यात आला आहे. संबंधित वॉर्डातील स्वच्छतागृहांमध्ये अतिशय घाण तसेच दुर्गंधी पसरल्याची परिस्थिती आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, कोरोनाबाधित रुग्णांना दिल्या जाणारा आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा व निकषानुसार नसल्याचे समोर आले आहे.
संबंधित रुग्णांना अतिशय तिखट व तेलात तळलेल्या दोन भाज्या, भात व एक चपाती एवढाच आहार दिला जात आहे. या गंभीर प्रकारावर शुक्रवारी रात्री ऊहापोह झाल्यानंतर आहार समितीचे अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी कोरोनाबाधित रुग्णांना दिल्या जाणाºया आहारात तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले. त्याचा परिणाम शनिवारी सकाळी दिसून आला.
आधी पत्रावळी आता ताट!
आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाचे १३१ रुग्ण दाखल आहेत. त्यांना यापूर्वी पत्रावळीमध्ये जेवण दिले जात होते. आहार समितीने दखल घेतल्यानंतर शनिवारपासून रुग्णांना स्टीलच्या ताटामध्ये जेवण देण्यात आले.
कोरोनाबाधित रुग्णांचा आहार अत्यंत पौष्टिक व दर्जेदार असावा, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने आहार देण्याची व्यवस्था करावी. रुग्णांच्या तक्रारीत वाढ झाल्यास प्रशासनाची खैर नाही, एवढे निश्चित.
- विजय अग्रवाल, अध्यक्ष, आहार समिती.