‘मजुरी’चे भूत दारूबंदीच्या मानगुटीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 02:53 AM2017-09-11T02:53:28+5:302017-09-11T02:53:35+5:30
बोरगाव मंजू येथे दारूबंदी करण्यासाठी संघर्ष समितीने मागील दोन महिन्यांपासून केलेल्या प्रयत्नांवर अकोल्यातील एका मद्यसम्राटाने अवघ्या २४ तासांत पाणी फेरले. मतदानाला न जाता शेतात मजुरीसाठी जाणार्या महिलांना तीन दिवसांची, तर मतदानाला जाऊन ‘उभ्या बाटली’ला मतदान करणार्या महिलांना चार दिवसांची मजुरी आगाऊ स्वरूपात देण्यात आली. त्याचप्रमाणे मतदानासाठी मतदान केंद्रावर आपल्या पत्नीला न पाठविणार्या नवरोबांनाही मजुरी म्हणून पाचशे ते एक हजार रुपये मजुरीदाखल देण्यात आले असून, मद्यसम्राटाने रचलेला हा ‘मजुरी’चा खेळ संघर्ष समितीच्या प्रयत्नांवर भारी पडला असल्याचे बोलले जात आहे.
गणेश मापारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : बोरगाव मंजू येथे दारूबंदी करण्यासाठी संघर्ष समितीने मागील दोन महिन्यांपासून केलेल्या प्रयत्नांवर अकोल्यातील एका मद्यसम्राटाने अवघ्या २४ तासांत पाणी फेरले. मतदानाला न जाता शेतात मजुरीसाठी जाणार्या महिलांना तीन दिवसांची, तर मतदानाला जाऊन ‘उभ्या बाटली’ला मतदान करणार्या महिलांना चार दिवसांची मजुरी आगाऊ स्वरूपात देण्यात आली. त्याचप्रमाणे मतदानासाठी मतदान केंद्रावर आपल्या पत्नीला न पाठविणार्या नवरोबांनाही मजुरी म्हणून पाचशे ते एक हजार रुपये मजुरीदाखल देण्यात आले असून, मद्यसम्राटाने रचलेला हा ‘मजुरी’चा खेळ संघर्ष समितीच्या प्रयत्नांवर भारी पडला असल्याचे बोलले जात आहे.
बोरगाव मंजू येथील दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रविवारी मतदान प्रक्रिया राबविली. या दारूबंदीसाठी अपेक्षित प्रमाणात महिलांचे मतदान न झाल्यामुळे बोरगाव मंजू येथे आता दारूची दुकाने सुरू राहणार आहेत. दरम्यान, गावात दारूबंदी व्हावी, यासाठी येथील संघर्ष समितीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यासाठी गावातील प्रत्येक वार्डात जनजागृती करण्यासोबतच महिला सभा तसेच विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे बोरगाव मंजू येथे दारूबंदी होणारच, असे वातावरण निर्माण झाले असल्याचा दावा संघर्ष समितीकडून केला जात होता. मात्र, अकोल्यातील एका मद्यसम्राटाने गरीब महिलांना जादा मजुरीचे आमिष दाखवून मजुरीला पाठवून ही लढाई जिंकल्याची चर्चा होत आहे. शेतातील विविध कामांसाठी बोरगाव मंजू परिसरात स्त्री-पुरुष मजुरांना सध्या १00 ते १५0 रुपये याप्रमाणे एका दिवसाची मजुरी देण्यात येते. नेमकी हीच बाब हेरून या धुर्त मद्यसम्राटाने बोरगाव मंजूत रविवारी मजुरीस जाणार्या महिला मजुरांसाठी मजुरीची खास योजना आखली. मतदानाला न जाणार्या महिलांना एका दिवसाच्या कामासाठी तीन दिवसांची मजुरी म्हणजेच ५00 रुपये, तर मतदानाला जाऊन उभ्या बाटलीला मतदान करणार्या मजूर महिलांना चक्क चार दिवसांची मजुरी म्हणजे ६00 रुपये शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटेच देण्यात आले. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी आपल्या पत्नीला बाहेरगावी पाठविणार्या नवरोबांना १000 रुपये विशेष मजुरी म्हणून देण्यात आल्याची चर्चा आहे.
रामजीनगरात पकडला महिलांना पळविणारा ऑटो!
बोरगाव मंजू येथील काही महिलांना बाहेरगावी पाठविण्यासाठी मद्यसम्राटाकडून शनिवारी रात्रीपासूनच प्रयत्न करण्यात आले. रविवारी पहाटे, सोनाळा मार्गे अकोलाकडे काही महिलांना पाठविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी ऑटोचा पाठलाग केला असता ऑटोचालक फरार झाला, तर महिलासुद्धा शेत शिवाराकडे निघून गेल्याची माहिती आहे.
शनिवारी रात्री बोरगावात दारूचा महापूर
दारूबंदीसाठी रविवारी मतदान होणार असल्याने दारूबंदी अयशस्वी करण्यासाठी अकोल्यातील याच मद्यसम्राटाने शनिवारी रात्री बोरगावात मोठय़ा प्रमाणात दारूसाठा आणला. वेगवेगळ्या तीन ठिकाणी पिण्या-खाण्याची सोय करण्यात येऊन, प्रत्येक मद्यपीला ‘बंपर’चेच वाटप करण्यात आले. बोरगावातील नागरिकांसोबतच प्रशासनातील काही कर्मचार्यांच्या खाण्या-पिण्याची सोयसुद्धा सदर मद्यसम्राटाकडूनच करण्यात आली होती, हे उल्लेखनीय!
भाववाढीच्या धास्तीने मद्यपींकडून सहकार्य
गावात दारूबंदी राहिल्यास देशी-विदेशी सर्व प्रकारची दारू चढय़ा दराने विकली जाते. सध्यादेखील बोरगावात अवैधरीत्या दारूविक्री करणार्या विक्रेत्यांकडून देशी दारूवर ५0 रुपये, तर विदेशी दारूवर १00 रुपये जास्त घेतले जातात. त्यामुळे दारूबंदीनंतर गावात जास्त भाव देऊन दारू खरेदी करावी लागेल, या धास्तीने अनेक मद्यपींनी दारूबंदी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले आहेत.