तूर खरेदीचा गुंता कायम; १५ हजार शेतकरी प्रतीक्षेत!
By admin | Published: July 13, 2017 01:10 AM2017-07-13T01:10:44+5:302017-07-13T01:10:44+5:30
जिल्ह्यात ३ लाख ५२ हजार क्विंटल तुरीची खरेदी केव्हा सुरू होणार?
संतोष येलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हमीदराने ‘नाफेड’द्वारे महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर बंद करण्यात आलेली तूर खरेदी अद्यापही सुरू करण्यात आली नाही. तूर खरेदीचा गुंता कायम असल्याने, नोंदणी केलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या ३ लाख ५२ हजार २३७ क्विंटल तुरीची खरेदी केव्हा सुरू करण्यात येणार, याबाबत जिल्ह्यातील १४ हजार ५२४ तूर उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत ‘नाफेड’द्वारे जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाचही खरेदी केंद्रांवरील हमीदराने तूर खरेदी गत १० जूनपासून बंद करण्यात आली. खरेदी केंद्रांवर तूर खरेदीसाठी नोंदणी केलेल्या आणि टोकन दिलेल्या जिल्ह्यातील १४ हजार ५२४ शेतकऱ्यांची ३ लाख ५२ हजार २३७ क्विंटल तूर अद्याप खरेदी करण्यात आली नाही. महिना उलटून गेला; मात्र तूर खरेदी सुरू करण्यात आली नसल्याने, खरेदीअभावी तूर शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. दरम्यान, शेतकरी जागर मंचच्यावतीने गत आठवड्यात छेडण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान नोंदणी करण्यात आलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची तूर दोन दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून आ. बच्चू कडू यांना देण्यात आले होते. आठवडा उलटून गेला; मात्र तूर खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यानुषंगाने तूर खरेदीचा गुंता कायम असल्याने, तूर खरेदी सुरू होणार तरी केव्हा, याबाबत जिल्ह्यातील १४ हजार ५२४ तूर उत्पादक शेतकऱ्यांना जीव टांगणीला लागला आहे.
१२५ तुरीचे ट्रॅक्टर उभे!
तूर बंद असल्याने, पावसाच्या वातावरणात अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या खरेदी केंद्रांवर मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या काही शेतकऱ्यांनी तूर घरी नेली असून, काही शेतकऱ्यांची तूर मात्र अद्याप खरेदी केंद्रावरच आहे. त्यामध्ये अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तुरीचे १२५ ट्रॅक्टर मोजमापाच्या प्रतीक्षेत उभे असून, टॅ्रक्टरमधील तूर शेतकऱ्यांनी ताडपत्रीने झाकली आहे.
नोंदणी करण्यात आलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या १४ हजार ५२४ शेतकऱ्यांची ३ लाख ५२ हजार क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर तूर खरेदी सुरू करण्यात येणार आहे.
- बजरंग ढाकरे,
जिल्हा मार्केटिंग अधिकारी.