गरीब शिधापत्रिकाधारकांना मिळणार तीन महिन्यांचे धान्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:09 AM2020-03-25T11:09:15+5:302020-03-25T11:09:21+5:30
गरीब शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे धान्य चालू महिन्यातच मिळणार आहे.
अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये गरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ११ लाख ७५ हजार २६३ गरीब शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य चालू महिन्यात वितरित करण्याचे नियोजन जिल्हा पुरवठा विभागामार्फत मंगळवारी करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे धान्य चालू महिन्यातच मिळणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणासाठी शासन-प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच २४ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये गरीब कुटुंबांची उपासमार होऊ नये, धान्याच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी गरीब शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य वितरण चालू महिन्यात (मार्चमध्ये) करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील ११ लाख २९ हजार ३४० आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत ४५ हजार ९२३ अशा एकूण ११ लाख ७५ हजार २६३ शिधापत्रिकाधारक लाभार्थींना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य चालू महिन्यात करण्याचे नियोजन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना तीन महिन्यांचे धान्य वितरण चालू महिन्यात करण्यात येणार आहे.
१ लाख ८ हजार क्विंटल धान्यसाठा वितरणाचा आदेश!
जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारक ११ लाख ७५ हजार २६३ लाभार्थींना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य चालू महिन्यात वितरित करण्यासाठी १ लाख ८ हजार ८१० क्विंटल धान्यसाठा वितरित करण्यात येत असल्याचा जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे यांनी २४ मार्च रोजी दिला. त्यामध्ये ६१ हजार १५५ क्विंटल गहू आणि ४७ हजार ६५५ क्विंटल तांदूळ वितरणाचा समावेश आहे.
शासन आदेशानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य वितरण मार्च महिन्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय धान्य वितरणाचा आदेश देण्यात आला आहे.
-बी. यू. काळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी.