गरिबांना एक रुपयात मिळणार एक किलो ज्वारी, मका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:14 AM2020-07-24T10:14:32+5:302020-07-24T10:14:38+5:30
गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी १ रुपया किलो दराने १ किलो मका व ज्वारी वितरित करण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील मका व ज्वारी खरेदी करण्यात आली असून, शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत २२ जुलै रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी १ रुपया किलो दराने १ किलो मका व ज्वारी वितरित करण्यात येणार आहे.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनामार्फत २०२०-२१ या वर्र्षीच्या रब्बी हंगामातील ज्वारी व मका राज्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला. त्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकºयांकडून १७ रुपये ६० पैसे प्रती किलो दराने मका व २५ रुपये ५० पैसे प्रती किलो दराने ज्वारी खरेदी करण्यात आली. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ज्वारी व मका इत्यादी भरड धान्य खरेदीची मुदत१५ जुलै रोजी संपुष्टात आली.
त्यानुषंगाने राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये मका व ज्वारी इत्यादी भरड धान्याची खरेदी करण्यात आली, त्याच जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या ज्वारी व मका या भरड धान्याचे वितरण राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना आॅगस्टपासून करण्याचा आदेश शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत २२ जुलै रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्हा पुरवठा अधिकाºयांना देण्यात आला आहे.
त्यानुसार राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी १ रुपये किलो दराने १ किलो मका किंवा ज्वारी वितरित करण्यात येणार आहे.
वितरणात हलगर्जी केल्यास शिस्तभंगाची कारवाई!
ज्वारी व मका इत्यादी भरड धान्याचे वितरण आॅगस्टमध्ये प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना करावयाचे आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत भरड धान्य वाटपाची कार्यवाही पूर्ण दक्षता घेण्याच्या सूचना देत, यासंदर्भात हलगर्जी झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकात देण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानुसार आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात शेतकºयांकडून खरेदी करण्यात आलेला मका जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रती किलो १ रुपया दराने वितरित करण्यात येणार आहे. भारतीय खाद्य निगमच्या गुणवत्ता नियंत्रक कक्षाकडून चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आॅगस्टमध्ये शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी १ किलो मका वितरित करण्यात येणार आहे.
-बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.