लोकसंख्या पाच लाखांवर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र गॅसवर; शहर बससेवा चार वर्षांपासून बंद

By Atul.jaiswal | Published: July 10, 2023 05:59 PM2023-07-10T17:59:07+5:302023-07-10T17:59:24+5:30

पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर असलेल्या अकोल्याचा गत काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला.

population is over five lakhs, but the public transport system is on gas | लोकसंख्या पाच लाखांवर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र गॅसवर; शहर बससेवा चार वर्षांपासून बंद

लोकसंख्या पाच लाखांवर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र गॅसवर; शहर बससेवा चार वर्षांपासून बंद

googlenewsNext

अकोला : छोट्याशा शहराचा विस्तार होऊन महानगरात रूपांतर झालेल्या अकोल्याची लोकसंख्या आज रोजी ५ लाखांपेक्षाही अधिक झाली असली तरी स्थानिक प्रशासनाला अजूनही दर्जेदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारता आली नाही. महानगरपालिकेची शहर बससेवा गत चार वर्षांपासून बंद असल्याने स्वत:चे वाहन वापरणे किंवा ऑटोरिक्षाची कास धरण्याशिवाय दुसरा पर्यायच नागरिकांपुढे नसल्याने त्यांच्या खिशाला नाहक कात्री लागत आहे. 

पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर असलेल्या अकोल्याचा गत काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला. महानगरपालिकेची हद्दवाढ होऊन लगतच्या २४ गावांचा शहरात समावेश करण्यात आला. परिणामी, शहराच्या भौगोलिक क्षेत्रासोबतच व लोकसंख्येतही भर पडली. शहरातील नागरिकांना वाहतूक व्यवस्था म्हणून महापालिकेने २००४ मध्ये शहर बससेवा सुरू केली होती. एका स्थानिक संस्थेने कंत्राट घेऊन काही वर्षे ही सेवा सुरळीत चालू ठेवली. त्यानंतर मात्र संस्था अवसायनात निघाल्यामुळे बससेवा कोलमडली. अखेर २०१३ मध्ये शहर वाहतूक सेवा बंद झाली. त्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये पुन्हा शहर बससेवा सुरू केली. श्रीकृपा ट्रॅव्हल्स नामक कंपनीने १५ ते २० गाड्यांच्या मदतीने शहर बससेवा सुरू केली, मात्र कंपनीच्या संचालकांनी बँकेच्या कर्जाचे कारण पुढे करत ही सेवा पुढे सुरू ठेवण्यात असमर्थतता दर्शविली. त्यामुळे जून २०१९ मध्ये शहर बससेवा बंद पडली. त्यानंतर २०२१ मध्ये शहर बससेवा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले; परंतु त्याला यश न आल्यामुळे अकोलेकर अजूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपासून वंचितच आहेत.

सात किलोमीटरसाठी ४० रुपये
शहरातील विविध मार्गांवर सिटी बससेवा सुरू होती, तेव्हा नागरिकांना शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जाण्यासाठी १० ते २० रुपयांपेक्षा अधिक खर्च करावा लागत नव्हता. आता मात्र ही सेवा बंद झाल्यापासून ऑटोरिक्षाचालकांनी मनमानी करत दर वाढविले आहेत. रेल्वे स्थानकावरून बसस्थानक एक टप्पा व बसस्थानकावरून वेगवेगळे नगर हा दुसरा टप्पा, असे दोन टप्प्याचे एका प्रवाशाकडून ४० रुपये घेतले जातात. शहरात सात ते आठ किलोमीटरच्या प्रवासासाठी ४० रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

Web Title: population is over five lakhs, but the public transport system is on gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला