घरच पॉझिटिव्ह, शेवटच्या प्रवासातही कोणी सोबत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:19 AM2021-03-17T04:19:07+5:302021-03-17T04:19:07+5:30
कोरोनाने अख्ख्या जगाला रक्ताची नाती विसरायला लावली. मृतकांवर रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करणे गरजेचे आहे. मात्र, कोरोनाने मृत्यू झाल्यास आपल्याच कुटुंबातील ...
कोरोनाने अख्ख्या जगाला रक्ताची नाती विसरायला लावली. मृतकांवर रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करणे गरजेचे आहे. मात्र, कोरोनाने मृत्यू झाल्यास आपल्याच कुटुंबातील व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यासाठी गेल्यास आपल्याला संसर्ग होईल या भीतीने कोणी येत नव्हते. मानवतेच्या दृष्टीने काही सामाजिक संस्था व व्यक्तींनी मात्र पुढाकार घेतला आहे. साेमवारी शहरातील एका खासगी रुग्णालयात ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत व्यक्ती अविवाहित असून कुटुंबात भाऊ, बहीण आहे; मात्र मृत व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाने विळखा घातल्याने अंत्यसंस्काराला कोणाला उपस्थित राहता आले नाही. शेवटच्या क्षणाला जिथे हजारोंची गर्दी होत होती, त्या ठिकाणी आता कामावरील व्यक्तीला पाठविण्याची वेळ कुटुंबावर आली. ही लोकसेवेची संधी समजून मोहता मिल येथील कर्मचारी दीपक शिंदे तसेच कच्छी मेमन जमातचे सामाजिक कार्यकर्ते जावेद जकारीया, मोहम्मद अफसर, वसीम खान आणि समीर खान यांनी कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
--कोट--
कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्काराबाबत मृत व्यक्तीचे भाऊ यांच्याशी संपर्क केला. ते पॉझिटिव्ह असल्याने येऊ शकत नव्हते. अंत्यसंस्कार करून राख नदीत वाहून द्यावी, असे सांगण्यात आले. काेराेनामुळे अनेकांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून जड अंत:करणाने असे निर्णय घ्यावे लागत आहेत याचा अनुभव गेल्या वर्षभरात आला आहे.
दीपक शिंदे, कर्मचारी, मोहता मिल हिंदू स्मशानभूमी