मूर्तिजापूर येथे एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:14 AM2021-06-22T04:14:17+5:302021-06-22T04:14:17+5:30
------------------------ तेल्हारा तालुक्यात तीन पॉझिटिव्ह तेल्हारा : तालुक्यात कोरोनाचा आलेख घसरत चालला आहे. दि. २१ जून रोजी प्राप्त अहवालानुसार, ...
------------------------
तेल्हारा तालुक्यात तीन पॉझिटिव्ह
तेल्हारा : तालुक्यात कोरोनाचा आलेख घसरत चालला आहे. दि. २१ जून रोजी प्राप्त अहवालानुसार, तालुक्यातील तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कोरोनाचे संकट कायम असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
------------------------
जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख अहवाल निगेटिव्ह
अकोला : आजपर्यंत एकूण २,८७,५३६ नमुने तपासण्यात आले. आजपर्यंत एकूण अहवाल प्राप्त झाल्यानुसार, निगेटिव्ह अहवालांची संख्या दोन लाख ४४ हजार ५४६ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
--------------------------
कडोसी येथील रुग्णाचा मृत्यू
बाळापूर : तालुक्यातील कडोसी येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या महिलेस दि. १४ जून रोजी दाखल करण्यात आले होते. कोरोनाचे संकट कायम असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
------------------
तेल्हारा तालुक्यात ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू
तेल्हारा: तालुक्यातील गाडेगाव येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, या महिलेस दि. १४ जून रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
----------------------------
शिकवणी वर्ग संचालक सापडले अडचणीत
अकोट: तालुक्यातील स्पर्धा परीक्षावर्गाचे संचालक अडचणीत सापडले आहे. अद्यापही शासनाने त्यांना वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. तत्काळ वर्गांना परवानगी देण्याची मागणी आहे.
-----------------------------
इंटरनेटअभावी विविध कामे झाली बाधित
बार्शीटाकळी : दोन दिवसांपासून शहरातील बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा ही अनियमितपणे सुरू आहे. त्यामुळे शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. वारंवार ही समस्या उद्भवत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
-------------------------
शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभतच नाही
बाळापूर : गेल्या हंगामात कापसावर आलेली बोंडअळी व बोगस सोयाबीन बियाणे, यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य बियाणे यासंबंधी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा आहे.
--------------------------
पांदण रस्ते गायब झाल्याने अडचण
खिरपुरी : महसूल विभागाच्या दुर्लक्षित धोरणाने बाळापूर तालुक्यातील अनेक गावांतील पांदण रस्ते आता गायब झाले. शेतात जाणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. या रस्त्यावरून शेतकऱ्यांत भांडणे वाढली असून, तक्रारी पोलिसात जात आहे.
------------------------------------
देगाव-वाडेगाव रस्त्यावर खड्डे
वाडेगाव : देगाव-वाडेगाव या रस्त्याची चाळण झालेली आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता कित्येक दिवसांपासून ठिकठिकाणी उखडला आहे. दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
----------------------------
पीककर्जासाठी बँकेत गर्दी
अकोला : खरीप हंगामात पीककर्ज काढण्यासाठी तेल्हारा, अकोट व बाळापूर तालुक्यांतील जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. २१ जून रोजी बँकेत गर्दी झाल्याचे दिसून आले.
-------------------
आलेगाव परिसरात पेरणीला वेग!
आलेगाव : परिसरातील काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केल्याचे चित्र दिसून आले. यात शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीवर अधिक भर दिल्याचे दिसून आले. दरम्यान, तालुक्यात बियाण्यांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
----------------------------
किसान सन्मानाच्या लाभाची प्रतीक्षा!
अकोला : जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. प्रशासनाच्या निर्देशानुसार बँक खाते, आधारकार्डसह नावात दुरुस्ती करूनही त्यांना योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही.
-----------------------------
जिल्ह्यात योग दिन उत्साहात
अकोला : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून विविध शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, राजकीय पक्षाच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर बहुतेक ठिकाणी योगाभ्यासावर आधारित ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम पाठविण्यात आले. शारीरिक व मानसिक आरोग्य सुरळीत राखण्यासाठी नियमित योगाभ्यास करणे गरजेचे असल्याने योगाभ्यास करण्याचे आवाहन योगाचार्यांनी यावेळी केले.