मोजणीअभावी रखडला जागेचा ताबा!
By admin | Published: May 17, 2017 01:59 AM2017-05-17T01:59:14+5:302017-05-17T01:59:14+5:30
भूमी अभिलेख विभागाद्वारे मोजणी होणार केव्हा?
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील निमवाडीस्थित खुल्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामासाठी पाच महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या जागेची मोजणी अद्याप करण्यात आली नसल्याने, जागेचा ताबा सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाला देण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या अकोला उपअधीक्षक कार्यालयामार्फत जागेची मोजणी केव्हा केली जाणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अकोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्यासाठी सन २००६-०७ मध्ये शासनामार्फत मंजुरी देण्यात आली; परंतु जागा उपलब्ध झाली नसल्याने सामाजिक न्याय भवन बांधकामाचे घोंगडे भिजतच राहिले. अकोल्यातील निमवाडीस्थित पोलीस विभागाच्या ताब्यातील जागेपैकी ८ हजार ९३७ चौरस मीटर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारत बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यास सन २०१४ मध्ये शासनामार्फत मान्यता देण्यात आली. त्यानंतर सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेली निमवाडीतील जागा सामाजिक न्याय विभागाच्या नावे करण्याची अधिसूचना शासनाच्या नगर विकास विभागामार्फत गत डिसेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामासाठी ८ हजार ९३७ चौरस मीटर जागा देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गत १७ जानेवारी रोजी दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सामाजिक न्याय भवनासाठी जागा देण्याकरिता जागेची मोजणी करून जागेचा ताबा सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाला देण्याचे निर्देश अकोला तहसीलदारांनी पत्राद्वारे भूमी अभिलेख विभागाच्या अकोला उपअधीक्षक कार्यालयाला दिले; परंतु पाच महिन्यांचा कालावधी उलटून जात असला, तरी भूमी अभिलेख विभागाच्या अकोला उपअधीक्षक कार्यालयामार्फत जागा मोजणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. जागेच्या मोजणीअभावी सामाजिक न्याय भवनाच्या बांधकामासाठी जागेचा ताबा सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाला देण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागामार्फत जागेची मोजणी केव्हा केली जाणार आणि सामाजिक न्याय भवनाच्या इमारत बांधकामासाठी जागेचा ताबा केव्हा दिला जाणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात भूमी अभिलेख विभागाच्या अकोला उपअधीक्षक सारीका कडू यांच्याशी मंगळवारी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.
जागेची मोजणीही रखडली!
सामाजिक न्याय भवन उभारणीसाठी मंजूर करण्यात आलेल्या जागेची मोजणी करून, जागेचा ताबा सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाला द्यायचा आहे; परंतु भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयामार्फत जागेची मोजणी अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे जागा ताब्यात देण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यानुषंगाने भूमी अभिलेख आणि महसूल प्रशासनामार्फत जागेचा ताबा सामाजिक न्याय विभागाला देण्याची प्रक्रिया केव्हा पूर्ण करण्यात येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
--