भूखंड घेतला ताब्यात; शाळेला लावले कुलूप, महापालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 03:02 PM2018-09-11T15:02:31+5:302018-09-11T15:04:13+5:30
अकोला : मनकर्णा प्लॉटस्थित महापालिकेच्या भूखंडावर अवैधरीत्या कब्जा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी मनपा प्रशासनाने शेख नावेद शेख इब्राहिम याच्याकडून भूखंड ताब्यात घेतला
अकोला : मनकर्णा प्लॉटस्थित महापालिकेच्या भूखंडावर अवैधरीत्या कब्जा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी मनपा प्रशासनाने शेख नावेद शेख इब्राहिम याच्याकडून भूखंड ताब्यात घेतला. या भूखंडावर सुरू असलेल्या शाळेला अतिक्रमण विभागाने कुलूप लावले होते. यादरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य लक्षात घेता पुढील सुनावणी होईपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश स्थानिक न्यायालयाने मनपा प्रशासनाला दिले आहेत.
उत्तर झोन अंतर्गत येणाऱ्या मनकर्णा प्लॉट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मनपाच्या मालकीचा नझुल शिट क्रमांक ३७ ए व प्लॉट क्रमांक -४ नुसार चार हजार चौरस फुटाचा भूखंड आहे. या भूखंडाचा मूळ हक्क व आखीव पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड मनपाच्या मालकीचे आहे. असे असताना सदर भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लिजवर घेतल्याचे दाखवून नगररचना विभागाच्या परवानगीने शेख नावेद शेख इब्राहिम यांना विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात मनपा प्रशासनाने शेख नावेद शेख इब्राहिम याच्या विरोधात सिटी कोतवाली पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शेख नावेद याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. सदर भूखंड तातडीने ताब्यात घेण्याचा आदेश महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी नगररचना विभागाला दिल्यानंतर सोमवारी भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही कारवाई मनपाचे नगररचनाकार संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी वासुदेव वाघाडकर, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहाद्दूर, विधी विभाग प्रमुख श्याम ठाकूर यांच्यासह मनपा कर्मचाºयांनी पार पाडली.
सुनावणीपर्यंत शाळा सुरू ठेवा!
मनपाच्या चार हजार चौरस फुटाच्या भूखंडावर उर्दू मुले-मुलींसाठी शाळा उभारण्यात आली आहे. मनपाने शाळेला कुलूप लावण्याची कारवाई केल्यानंतर शेख नावेद यांनी स्थानिक न्यायालयात धाव घेतली. पुढील सुनावणीपर्यंत मनपाने सकाळी ६.३० वाजता शाळेचे कुलूप उघडावे अन् सायंकाळी ६ वाजता पुन्हा कुलूप लावावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
मनपाच्या भूखंडावर शाळा उभारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य लक्षात घेता न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा सुरू ठेवली जाईल. निकालाअंती शाळा व्यवस्थापनाला त्यांची इतरत्र सोय करावी लागेल, यात दुमत नाही.
-जितेंद्र वाघ, आयुक्त मनपा