पौर्णिमेनंतर कपाशीवर अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 02:29 PM2019-10-15T14:29:58+5:302019-10-15T14:30:21+5:30
कपाशीवर यावेळी नवीन लष्करी अळीचा धोका वाढल्याने कृषी विभागाने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
अकोला: अमावास्या, पौर्णिमेनंतर पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढतो, असा समज आहे. काही अर्थाने हे खरेही ठरत असून, कपाशीवर यावेळी नवीन लष्करी अळीचा धोका वाढल्याने कृषी विभागाने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात ठिकठिकाणी या अळीने मका पीक फस्त केले असून, मका पीक काढणीनंतर इतर पिकांकडे मोर्चा वळविला आहे. सोलापूर जिल्ह्यातून संपूर्ण राज्यात प्रवेश करणारी ही अळी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या सुसरे गावात कपाशीवर आढळून आली आहे. बहुभक्षीय ही अळी ८० पिकांवर उपजीविका करते. विदर्भात व या जिल्ह्यात सध्या तरी कपाशीवर ही अळी दिसली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोेहन वाघ यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशी पिकांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.
कपाशी पिकांवर प्रादुर्भाव आढळल्या शेतकºयांनी प्रथम प्रादुर्भावग्रस्त पिकांचे अवशेष नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे.
- काय उपाय योजना कराल?
मका पिकांच्या अवशेषांमधील अळ््यांचे कपाशी व इतर पिकांवर होणारे संक्रमण रोखण्यासाठी मका पीक काढणीनंतर रोटावेटरच्या साहायाने अवशेषांचे बारीक तुकडे, भुगा करावा. त्यामुळे त्यावरील अळ्या व मातीतील कोष चिरडले जाऊन कीड, अळीचे नियंत्रण मिळण्यास मदत होते. रोटावेटर मारण्यापूर्वी शेतातील अवशेषांवर मेटारायझियम अनिसोप्ली ५ ग्रॅम अथवा नोमुरिया रियाली ५ ग्रॅम प्रति लीटर पाणी याप्रमाणे जैविक बुरशीनाशकांंची फवारणी केल्यास ते मातीत मिसळले जाऊन जैविक बुरशीद्वारे चांगले नियंत्रण मिळू शकेल. सध्या ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे हवेतील आर्द्रतेचे अधिक प्रमाण हे जैविक बुरशीच्या वाढीसाठी पोषक ठरत आहे.
- ही यांत्रिक पद्धती वापरा!
कपाशीची प्रादुर्भावग्रस्त फुले व बोंडे वेचून अळ््यासहित नष्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.
-रासायनिक पद्धतीचा वापर कसा कराल?
पुढील नुकसान टाळण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त कपाशीवर स्पिनेटोरम ११.७ एस सी.- ०८ मिली अथवा क्लोरोंट्रानिलीप्रोल १८.५ एस सी.-०३ प्रती लीटर पाणी याप्रमाणे त्वरित फवारणी करावी.
- जैविक नियंत्रण
या उपाययोजनेनंतर एका आठवड्याच्या अंतराने मेटारायझियम अनिसोप्ली ५ ग्रॅम अथवा नोम्युरिया रियाली ५ ग्रॅम प्रतिलीटर पाणी याप्रमाणे जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.