धान्य दुकानांत बियाणे मिळण्याची शक्यता धूसर
By admin | Published: April 17, 2017 01:51 AM2017-04-17T01:51:05+5:302017-04-17T01:51:05+5:30
शेकडो दुकानांपैकी केवळ दहा दुकानदारांचे अर्ज
सदानंद सिरसाट - अकोला
स्वस्त धान्य दुकानदारांना प्रमाणित बी-बियाणे विक्री करण्याची संधी शासनाने दिली. त्यातून ग्रामीण भागातील गावांमध्येच शेतकऱ्यांना बियाणे मिळण्याची सोय होणार असताना, त्यासाठी जिल्ह्यातून केवळ नऊ दुकानदारांनी पुरवठा विभागाकडे अर्ज सादर केले. परवाना मिळण्याच्या प्रक्रियेबद्दल न सांगता पुरवठा विभागाने ते अर्ज थेट कृषी विभागाकडे पाठविल्याने त्यामध्ये कागदपत्रांच्या पूर्ततेचा गोंधळ वाढण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात सर्व सोयींचे ठिकाण म्हणून स्वस्त धान्य दुकानांमध्ये बी-बियाणे विक्रीसाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ३ मार्च २०१७ रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाने आदेश दिले. त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना कृषी विभागाचा परवाना घेऊन हा व्यवसाय सुरू करण्याचे सांगितले; मात्र दुकानदारांनी थेट पुरवठा विभागाकडेच अर्ज सादर केले आहेत. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील नऊ दुकानदार आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांनी आॅनलाइन धान्य वाटपाला विरोध केल्यानंतर त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने विविध व्यवसाय करण्यासाठी त्यांनी पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यापैकी बी-बियाणे विक्रीचाही पर्याय आहे; मात्र जिल्ह्यात एकूण १०३६ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यापैकी अकोला शहरातील १२७ च्या जवळपास दुकाने वगळता नऊशेपेक्षाही अधिक दुकानदारांना व्यवसायाची ही संधी आहे. कृषी विभागाच्या अटी व शर्तींचे पालन करून परवाना मिळण्यास किती पात्र आहेत, यावरच दुकानदारांचा या व्यवसायातील शिरकाव निश्चित होणार आहे.
प्रस्ताव सादर करण्यातच गोंधळ
शासनाने अत्यंत त्रोटक स्वरूपात आदेश दिला आहे. त्यानुसार दुकानदारांनी पुरवठा विभागाकडेच अर्ज सादर करणे सुरू केले आहे. ज्यांच्याकडे स्वस्त धान्य दुकान आहे, त्यांनी कृषी विभागाकडून परवाना मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्याऐवजी पुरवठा विभागाकडे प्राप्त अर्ज एकगठ्ठा पद्धतीने कृषी विभागात सादर केले आहेत. त्यातून कृषी विभागाचा गोंधळ वाढला आहे.
परवान्यासाठी थेट प्रस्तावांची गरज
स्वस्त धान्य दुकानदारांनी पुरवठा विभागामार्फत अर्ज केल्याने त्याबाबतचा पत्रव्यवहार त्या विभागाशी करावी की अर्जदारांशी, त्यावरून कृषी विभागाचे काम वाढणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने अर्ज सादर केले तरी नमुन्यात आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव आल्याशिवाय कृषी विभागाचा त्यावर निर्णयच होणार नसल्याची माहिती आहे.
केवळ बी-बियाणे विक्रीचा परवाना
शासनाने दुकानदारांना केवळ प्रमाणित बी-बियाणे विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. त्या आधारावर कोणत्याही परिस्थितीत दुकानदारांना रासायनिक खते, कीटकनाशके, कीडनाशकांची विक्री करता येणार नाही.
एक टक्का दुकानदारच तयार
जिल्ह्यातील शहरी भाग वगळता नऊशेपेक्षाही अधिक स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्या सर्वच दुकानदारांना बियाणे विक्रीचा परवाना मिळाल्यास शेतकऱ्यांची सोय होईल; मात्र गेल्या महिनाभरात केवळ नऊ दुकानदारांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. हे प्रमाण केवळ एक टक्का आहे.
अनेक गावांत कृषी सेवा केंद्राचीही भरमार
स्वस्त धान्य दुकानदारांना व्यवसायाची संधी असली, तरी अनेक गावांमध्ये कृषी सेवा केंद्रांची संख्याही मोठी आहे. त्यांच्या स्पर्धेत स्वस्त धान्य दुकानदारांचा टिकाव लागेल का, या भीतीनेही दुकानदार अद्याप पुढे आलेले नाहीत.