पोस्ट कोविड रुग्णांना ‘म्युकॉरमायकोसिस’चा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:19 AM2021-05-09T04:19:38+5:302021-05-09T04:19:38+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले असून, त्यांच्यावर उपचारासाठी प्रभावी औषध म्हणून रेमडेसिविर आणि स्टिरॉईडचा वापर केला जात ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले असून, त्यांच्यावर उपचारासाठी प्रभावी औषध म्हणून रेमडेसिविर आणि स्टिरॉईडचा वापर केला जात आहे. या औषधांचा वापर करताना मधुमेह असलेल्या कोविड रुग्णांमध्ये तसेच कोरोनातून बरे झालेल्या काही म्युकॉरमायकोसिस या फंगल इन्फेक्शनचा धोका दिसून येत आहे. विदर्भात काही जिल्ह्यांप्रमाणे हा धोका आता अकोल्यातही वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मागील दाेन महिन्यांत जिल्ह्यात फंगल इन्फेक्शनच्या पाच रुग्णांवर उपचार झाले असून, एका रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांनी विशेषत: मधुमेह असलेल्या कोविडच्या गंभीर रुग्णांनी बरे झाल्यानंतर विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
...तर उद्भवू शकतो धोका
कोविडच्या गंभीर रुग्णांवर उपचार म्हणून स्टिरॉईडचा वापर केला जातो, अशा रुग्णांमध्ये शुगरचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा रुग्णांच्या डोळ्यांसह नाकाच्या मागच्या हाडावर फंगल इन्फेक्शनचा धोका उद्भवू शकतो. हा धोका कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांना होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष केल्यास हे फंगल इन्फेक्शन मेंदूपर्यंतही जाण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
रुग्णांनी काय काळजी घ्यावी
ज्यांना मधुमेह हा आजार आहे किंवा शरीरातील शुगरचे प्रमाण कमी- जास्त होत राहते अशा रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांनी ही माहिती रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांना कळवावी. शिवाय, कोरोनातून बरे झाल्यानंतर नाकात त्रास असल्यास तत्काळ डॉक्टरांना कळवावे.
अकोल्यातही फंगल इन्फेक्शनचे काही रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. फंगल इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी कोविडच्या रुग्णांनी रुग्णालयात दाखल होताच मधुमेह असल्याचे डॉक्टरांना कळवावे. तसेच कोरोनातून बरे झाल्यावर नाकात त्रास असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेवून औषधोपचार घ्यावा.
- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, विभाग प्रमुख, मेडिसीन, जीएमसी, अकोला