जलप्रदायच्या कार्यकारी अभियंता पदाचा पेच; मनपात अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:13 AM2021-07-09T04:13:38+5:302021-07-09T04:13:38+5:30
केंद्र शासनाच्या ‘अमृत अभियान’अंतर्गत शहरात पाणी पुरवठा वितरण प्रणालीच्या कामांना २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली हाेती. ही याेजना लवकरात ...
केंद्र शासनाच्या ‘अमृत अभियान’अंतर्गत शहरात पाणी पुरवठा वितरण प्रणालीच्या कामांना २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली हाेती. ही याेजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, या उद्देशातून मनपा प्रशासनाने २८ जून २०१८ मध्ये सेवानिवृत्त उपअभियंता एच.जी.ताठे यांची जलप्रदाय विभागात कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली. त्यानंतर त्यांना वेळाेवेळी मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, शासन निर्णयानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी नियुक्ती देता येत नसल्याची सबब समाेर करीत मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी प्रभारी कार्यकारी अभियंता ताठे यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला हाेता. दरम्यान, या पदाचा अतिरिक्त प्रभार स्वीकारण्यास बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर इच्छुक नसल्याची माहिती आहे. ही बाब ध्यानात घेता आयुक्तांनी कंत्राटी तत्त्वानुसार सेवानिवृत्त अभियंत्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागितल्याची माहिती आहे. ताेपर्यंत ताठे यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मजीप्रातील अधिकारी इच्छुक
आज राेजी मनपाच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता पद, शहर अभियंता व जलप्रदाय विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता पद रिक्त असल्याने तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक मानसेवी अभियंत्यांच्या बळावर या दाेन्ही विभागाचे कामकाज सुरू आहे. दरम्यान, या पदासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील काही सेवानिवृत्त अधिकारी इच्छुक असून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.