पिंजर येथील उपकेंद्रात कनिष्ठ अभियंत्याचे पद रिक्त; नागरिक त्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:09 AM2021-05-04T04:09:07+5:302021-05-04T04:09:07+5:30
निहिदा : पिंजर येथील महावितरणच्या उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंत्याचे पद गत पाच महिन्यांपासून रिक्त असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड ...
निहिदा : पिंजर येथील महावितरणच्या उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंत्याचे पद गत पाच महिन्यांपासून रिक्त असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे येथील कनिष्ठ अभियंत्याचे पद भरून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी मुख्य अभियंत्याकडे निवेदनातून केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सरपंच चंद्रभागाबाई पुंडलिकराव मानकर यांनी केला आहे. पिंजर परिसरात विजेच्या विविध समस्यांची तक्रार दि. १२ एप्रिल २०२१ रोजी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच येथील उपकेंद्रात गत पाच महिन्यांपासून कनिष्ठ अभियंता नसल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. तक्रार दिल्यानंतर वरिष्ठांनी आश्वासनही दिले होते; मात्र तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सरपंच यांनी केला आहे. पिंजर तालुक्यातील मोठे सेंटर असून, जवळपास ६४ खेडी जोडली आहेत. त्यामुळे येथील वीज उपकेंद्रात कनिष्ठ अभियंत्याचे पद तत्काळ भरून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
–----------------
पिंजर येथील समस्यांबाबत वरिष्ठांना तक्रार दिली होती. तसेच येथील उपकेंद्रात कायमस्वरूपी अधिकारी मिळावा, अशी मागणी केली होती. मात्र, याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर मिळत आहे. गावात समस्या जैसे थे असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
- चंद्रभागा पुंडलिकराव मानकर, सरपंच, ग्रा. पं. पिंजर.