प्रभातफेरीतून टपाल विभागाच्या योजनांचा जागर
By Atul.jaiswal | Published: October 9, 2022 03:04 PM2022-10-09T15:04:46+5:302022-10-09T15:09:26+5:30
World Postal Day : अकोला डाक विभागाद्वारे रविवार, ९ ऑक्टोबर रोजी प्रभातफेरी काढून विविध योजनांचा जागर करण्यात आला.
अकोला : जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून अकोला डाक विभागाद्वारे रविवार, ९ ऑक्टोबर रोजी प्रभातफेरी काढून विविध योजनांचा जागर करण्यात आला.
अकोला डाक विभागाद्वारे ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी अकोला डाक मंडळातील अकोला प्रधान डाकघर, मुर्तीजापुर उपडाकघर, अकोट उपडाकघर येथे प्रभातफेरी काढण्यात आली. अकोला मुख्य डाकघर येथून सुरु झालेल्या प्रभातफेरीत डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मुख्य डाकघर ते सिटी कोतवाली चौक, जिल्हाधिकारी कार्यालय अशी मार्गक्रमना करत ही प्रभातफेरी अकोला मुख्य डाकघर येथे परत आली. प्रभात फेरीमध्ये कर्मचाऱ्यांनी डाक विभागाच्या विविध योजना संबंधीचे फलक प्रदर्शित केले. तसेच डाक विभागाच्या विविध योजनाची माहिती घोषणा देवून जन सामान्यापर्यंत पोहचवली.
वरिष्ठ अधिक्षक संजय आखाडे यांचे हस्ते मुख्य डाकघर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विभागीय कार्यालय अकोला येथे सहाय्यक डाक अधिक्षक सुनील एम. हिवराळे, एन.एस.बावस्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सर्व डाक कर्मचाऱ्यांनी अकोला डाक विभागातील आपल्या कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.