‘लॉकडाऊन’ : पोस्टमन घरपोच पोहोचविणार रोख रक्कम अन् किराणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 08:31 AM2020-04-02T08:31:52+5:302020-04-02T08:31:59+5:30
दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम आणि किराणा साहित्य ‘पोस्टमन’मार्फत घरपोच पोहोचविण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे.
अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत अकोला डाक विभागामार्फत अकोला व वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना बँक खात्यातून दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम आणि किराणा साहित्य ‘पोस्टमन’मार्फत घरपोच पोहोचविण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले आहे. ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत जे नागरिक घराबाहेर पडू शकत नाहीत, त्यांना त्यांच्या राष्ट्रीय बँक खात्यातून दहा हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम पोस्टमनमार्फत घरपोच अदा करण्यात येणार आहे. यासोबतच किराणा साहित्यही घरपोच पोहोचविण्यात येणार आहे. अकोला डाक विभागामार्फत अकोला व वाशिम जिल्ह्यात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही घरपोच सेवा उपलब्ध करण्यासाठी संबंधित खातेदार व्यक्तींनी प्रवर अधीक्षक डाकघर अकोला विभाग यांच्या ०७२४-२४१५०३९ या क्रमांकावर सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत आपले नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक तसेच आवश्यक रक्कम व हवे असलेले किराणा साहित्य यासंदर्भात माहिती देणे आवश्यक आहे, असे प्रवर अधीक्षक डाकघर अकोला विभागामार्फत कळविण्यात आले आहे.