बाळापुरातील पाच खासगी रुग्णालयांचे ‘पोस्टमार्टेम’
By admin | Published: March 19, 2017 02:54 AM2017-03-19T02:54:24+5:302017-03-19T02:54:24+5:30
विशेष तपासणी पथकाने शुक्रवारी छापा मारला.
अकोला, दि. १८- रुग्णालय चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध नियम व कायद्यांना धाब्यावर बसविणार्या बाळापूर येथील पाच डॉक्टरांच्या रुग्णालयांवर आरोग्य विभागाकडून गठित करण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकाने शुक्रवारी छापा मारला. यावेळी दोन रुग्णालयांची तपासणी करण्यात येऊन, त्यांचे नर्सिंग होम बंद करण्यात आले. तर उर्वरित तीन डॉक्टरांनी रुग्णालय बंद करून पलायन केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली.
म्हैसाळ जि. सांगली येथे स्त्री भ्रूणहत्या रॅकेट उघडकीस आल्याच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने १५ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान राज्यात खासगी रुग्णालयांची तपासणी करण्याची धडक मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले असून, त्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण स्तरावर समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हय़ातील पहिली कारवाई बाळापूर येथे शुक्रवारी करण्यात आली. यासाठी गठित करण्यात आलेल्या पथकाने शुक्रवारी दुपारी बाळापूर येथील फैज क्लिनिक, राऊत बाल रुग्णालय येथे छापा टाकला. यावेळी फैज क्लिनिकचे संचालक डॉ. अफसर खान यांनी बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अँक्ट अंतर्गत नोंदणी केलेली नसल्याचे आढळून आले, तसेच या रुग्णालयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायदा, बायोमेडिकल वेस्ट, अग्नि प्रतिरोधक यंत्रणा, अन्न व औषध कायद्याचे उल्लंघन झाल्याचे पथकास निदर्शनास आले, तर राऊत बालरुग्णालयात अन्न व औषध कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समोर आले.
पथकातील सदस्यांनी रुग्णालयांची तपासणी केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल तयार केला असून, तो जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वातील जिल्हास्तरीय समितीला सादर करण्यात येणार आहे.
या रुग्णालयांना बजावली नोटिस
फैज क्लिनिक व राऊत बाल रुग्णालयांमध्ये कारवाई सुरू असल्याचा सुगावा लागताच शहरातील जमजम हॉस्पिटल, राहत हॉस्पिटल व अफजल हॉस्पिटलच्या संचालकांनी त्यांची रुग्णालये बंद करून पळ काढला. पथक तेथे पोहोचल्यानंतर रुग्णालये बंद आढळून आली. त्या तिन्ही रुग्णालयांची नोंद बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अँक्ट अंतर्गत झालेली नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे पथकातील सदस्यांनी या तिन्ही रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिस बजावल्या.
नियमांचे उल्लंघन करणार्या बाळापुरातील २ रुग्णालयांवर कारवाई करून त्यांचे नर्सिंग होम बंद करण्यात आले आहे. इतर तीन रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
- डॉ. राजकुमार चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला