अकोला शहरातील रस्ते कामांचे ‘पोस्टमार्टेम’ सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:00 PM2018-07-23T14:00:59+5:302018-07-23T14:08:23+5:30
‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांतील गुणवत्ता तपासणीचे काम रविवार, २२ जुलैपासून सुरू करण्यात आले आहे.
अकोला : शासन निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेले रस्ते वर्षभरातच खराब झाल्याने, रस्ते कामांत अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँक्रिटीकरण झालेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येत आहे. त्यामध्ये रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांसह अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या तीन पथकाद्वारे रविवारी तीन रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले. त्यामुळे शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्तेचे ‘पोस्टमार्टेम’ सुरू करण्यात आले आहे.
शासनाकडून प्राप्त निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्ते कामांची पाहणी केली असता, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून आले. त्यामुळे काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्ते कामात प्रथमदर्शनी अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १६ जुलै रोजी काढले. त्यानुसार ‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांतील गुणवत्ता तपासणीचे काम रविवार, २२ जुलैपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अकोला उप विभागाच्या गुणनियंत्रण विभागाचे अधिकारी आणि अमरावती व अकोल्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या तीन पथकांकडून रस्ते कामांचे नमुने घेण्याचे काम सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी (रविवारी ) संबंधित तज्ज्ञांच्या तीन पथकांमार्फत तीन रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले असून, सोमवारी शहरातील इतर रस्ते कामांचेही नमुने घेण्यात येणार आहेत. रस्ते कामांच्या तपासणीत नमुने घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याने, शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्तेचे ‘पोस्टमार्टेम’ सुरू झाले आहे. या गुणवत्ता तपासणीत रस्ते कामांतील ‘पोलखोल’ होणार आहे.
‘या’ पथकांकडून घेण्यात येत आहेत नमुने!
-अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी.
- गुणनियंत्रण, जलसंपदा उप विभाग, अकोला आणि शिपला इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी.
- गुणनियंत्रण, सार्वजनिक बांधकाम उप विभाग अकोला आणि श्री शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी.
‘या’ तीन रस्ते कामांचे घेतले १० नमुने!
-मुख्य डाकघर ते सिव्हिल लाइन चौक
-टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक
-अग्रसेन चौक ते दुर्गा चौक
राष्ट्रीय महामार्गाच्या यंत्रणांनी दिल्या ‘कोरकटर ’मशीन!
शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीत नमुने काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची कामे करणाºया यंत्रणांनी ‘कोरकटर’मशीन उपलब्ध करुन दिल्या. त्यामध्ये बीसीसी कंपनी, स्कायलार्क कंपनी, ओरिएंटल कंपनी व साठे इन्फ्रा कंपनीमार्फत कोरकटर मशीन उपलब्ध करून दिल्या.
नमुना काढताना मशीन घसरली
अग्रसेन चौक ते दुर्गा चौक या रस्त्यावर कामाचा नमुना काढण्यासाठी ‘कोरकटर ’मशीन सुरू करण्यात आली; मात्र काही वेळातच मशीन घसरली. त्यामुळे दोघांना दुखापत झाली. त्यामध्ये स्कायलार्क कंपनीचे व्यवस्थापक सुधीर अकर्ते यांच्या खांद्याला मार लागला तर त्यांच्यासोबत असलेल्या एका जणाच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. दोघांनाही तातडीने एका खासगी रुग्णालयात रुग्णालयात भरती करण्यात आले.
मंगळवारपर्यंत घेणार नमुने!
शहरातील रस्ते कामांच्या तपासणीत तीन दिवस रस्ते कामांचे नमुने पथकांमार्फत घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये रविवारी तीन रस्त्यांचे नमुने घेण्यात आले असून, सोमवारी अशोक वाटिका चौक ते सरकारी बगिचा, मानेक टॉकीज ते मोहता मिल चौक, श्रीवास्तव चौक ते डाबकी रोड पोलीस चौकीपर्यंत रस्ते कामांचे नमुने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नमुने घेण्याचे काम मंगळवारपर्यंत चालणार आहे.