बटाट्याचे क्षेत्र ३० हजार हेक्टरपर्यंत वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 06:20 PM2020-04-04T18:20:08+5:302020-04-04T18:22:18+5:30
राज्यात अलीकडे बटाट्याचे क्षेत्र वाढले असून, मंचर, पुसेगाव आणि विदर्भात बटाटा पिकाचे हब तयार झाले आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोेला : बटाटा हे कंदमूळ पीक आहे. यात प्रचंंड ऊर्जा शक्ती निर्माण करणारे कर्बोदके (कार्बोहाइड्रेट) असल्याने गरीब देश, मेळघाट अशा दुर्गम भागातील जनतेसह सर्वांनाच बटाट्याची गरज आहे. आगामी काळात या पिकाचेच दिवस असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यात अलीकडे बटाट्याचे क्षेत्र वाढले असून, मंचर, पुसेगाव आणि विदर्भात बटाटा पिकाचे हब तयार झाले आहे. बटाटा मुळात थंड प्रदेशात येणारे पीक आहे. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात हे पीक घेतले जाते. देशात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्रातील मंचर ता. आंबेगाव, पुसेगाव (सातारा) पुणे, बारामती, राजगुरू नगर, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, विदर्भ, कर्नाटक राज्यातील हासन व इतरही राज्यांत कमी-अधिक प्रमाणात हे पीक घेतले जाते. देशात बटाट्याचे २१ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रात ३० ते ३५ हजार हेक्टरपर्यंत हे क्षेत्र वाढले आहे. आजमितीस देशात बटाट्याचे उत्पादन ५ कोटी १३ लाख १० हजार मेट्रिक टन होत आहे. राज्यात त्या तुलनेत उत्पादन कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बटाट्याचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्याची संधी आहे. बटाट्यात कार्बोहाइड्रेटसह स्टॉर्चचे प्रमाण अधिक आहे. उद्योगासह कापडासाठी स्टॉर्चचा वापर होतोे. यापासून पावडरही तयार होते. गत चार-पाच वर्षांत शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून राज्यात बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. विशेष करू न बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी गटाने करार शेतीच्या माध्यमातून बटाटा पीक घेतले. आता शेतकरी व्यक्तिगत पातळीवर हे पीक घेतात. प्रक्रिया करू न बटाटा चिप्स आणि इतरही पदार्थ तयार करण्यात येतात. त्यामुळेच शेती करार करण्यात आला होता. राज्यातील मंचर आणि पुसेगाव येथे खरीप हंगामातील बटाटा तसेच बियाणे उत्पादन घेतले जाते. हेक्टरी उत्पादन बुलडाणा जिल्ह्यात २२ टन गेले होते. आता हे उत्पादन बुलडाण्यात १० ते १२ टन आहे. मंचर, पुसेगावला यापेक्षा अधिक आहे. पुणे, वाशी, पुसेगाव, मंचर येथे बटाट्याची बाजारपेठ असून, घाऊक दरही १५ ते १८ रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहे. राज्यात सर्वाधिक बटाटा विक्री होते, हे विशेष.
फोटो बटाटा