अकोटातील दुकानदारांना अतिरिक्त धान्य वाटपाची शक्यता
By admin | Published: July 17, 2017 03:17 AM2017-07-17T03:17:42+5:302017-07-17T03:17:42+5:30
काळाबाजार करण्यासाठी गोदामातून सातत्याने धान्य गायब
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय धान्य वाटपासाठी साठा केलेल्या अकोटच्या गोदामातून गहू आणि तांदळाचा काळाबाजार करण्यासाठी दुकानदारांनाच अतिरिक्त धान्य वाटप केल्याची शक्यता मोजणीदरम्यान व्यक्त झाली. त्यामुळे गोदामपालाने गेल्या काही दिवसात वाटप केलेल्या धान्याच्या नोंदीची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीत दुकानदारांना मंजुरीपेक्षा अतिरिक्त धान्य वाटप केल्याचे पुरावे मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या प्रकरणात गोदामपाल मंगेश मेश्राम यांच्यावरच कारवाईचा फास आवळल्या जाण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच गोदामांची तपासणी करण्याचा आदेश प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी दिला. त्यानुसार तालुका स्तरावर असलेल्या गोदामांची चौकशी तहसीलदारांनी केली. अकोटच्या गोदामाची चौकशी करताना तहसीलदार विश्वनाथ घुगे यांना मोजणीमध्ये १४० क्विंटलपर्यंत गहू आणि ४५ क्विंटलच्या जवळपास तांदळाचा साठा कमी आढळून आला. त्यांचा अहवाल शनिवारी सायंकाळीच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना सादर करण्यात आला. दरम्यान, तहसीलदार घुगे यांनी धान्याच्या साठा तपासणीत ही बाब उघड झाली. गोदामात शनिवारपर्यंतच्या नोंदीनुसार उपलब्धतेपेक्षा साठा कमी आढळण्याची कारणे काय, याचा शोध घेण्यासाठी त्यांनी चौकशी सुरू केली. गोदामातील धान्य नेमके कोठे गेले, याचा शोध नव्याने घेतला जात आहे. त्याबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार गोदामपाल मंगेश मेश्राम यांनी तालुक्यातील काही दुकानदारांना दर महिन्यात अधिकचे धान्य वाटप केल्याची चर्चा आहे. अन्नधान्य वितरण विभागाचे निरीक्षण अधिकारी, तहसीलदार यांनी दुकानदारांना दरमहा किती धान्य मंजूर केले, त्या तुलनेत गोदामातून त्यांना किती देण्यात आले, या बाबींचा शोध घेतला जात आहे. गोदामातून दुकानदारांना वाटप केल्याच्या नोंदी कागदत्रावर बरोबर असतील, अतिरिक्त दिलेल्या धान्याची नोंद होण्याची शक्यता कमीच आहे. त्याचवेळी गोदामातील साठा कमी होण्याची जबाबदारी गोदामपालाची असल्याने कारवाईचा फास मंगेश मेश्राम यांच्या गळ््यात अडकणार, एवढे निश्चित आहे.
कारवाईचा प्रस्ताव आज सादर होण्याची शक्यता
तपासणीचा अहवाल शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यानुसार आता पुढील कारवाईसाठी पुरवठा विभागाचा प्रस्ताव उद्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होण्याची शक्यता आहे.