खड्ड्यांमुळे रस्त्यांची वाट; वाहनचालकांची दुखतेय पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:21 AM2021-08-26T04:21:23+5:302021-08-26T04:21:23+5:30
रवी दामोदर अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालक ...
रवी दामोदर
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. बाळापूर तालुक्यातून अकोला तालुक्याशी जोडणारा लोणाग्रा फाटा-मालवाडा फाटा या रस्त्याची वाट लागली असून, या रस्त्यावरील खड्ड्यांच्या दणक्याने वाहनचालक मात्र मणक्याच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. कामानिमित्त वाहनचालकांना रोज किमान १.५ ते २ किमी प्रवासासाठी कसरत करावी लागते. खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालविताना बसणाऱ्या हादऱ्यांमुळे मणक्याचे दुखणे वाढले आहे, तसेच वाहनांमध्येही बिघाड येऊन वाहनचालकांना दुरुस्तीचा जादा खर्च करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
अकोला व बाळापूर तालुक्यातील आगर ते लोणाग्रा, हातरूण ते बोरगाव वैराळे, हातरूण ते निमकर्दा, शिंगोली-हातरूण, तसेच लोणाग्रा फाटा- मालवाडा फाटा, अमानपूर ताकोडा, कंचनपूर-बादलापूर या रस्त्याने वाहन चालविण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याने किमान एक ते दीड फुटांपर्यंत खड्डे पडल्याने वाहन खड्ड्यांतून उसळते. त्यामुळे वाहनचालकांना मणक्याचा त्रास वाढला आहे. चारचाकी वाहनचालकास रस्ता दाखविण्यासाठी वाहनातील एकास उतरवून रस्ता सांगावा लागत असल्याचे या मार्गाने बुधवारी दिसून आले. रस्त्याची दुर्दशा झाल्याने ग्रामस्थांसह वाहनचालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-------------------------------------
या गावातील नागरिक त्रस्त
अकोला व बाळापूर तालुक्यातील आगर, उगवा, कंचनपूर, लोणाग्रा, मालवाडा, सिंगोली, हातरूण, बादलापूर, मोझरी, अमानतपूर ताकोडा या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे गावांतील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
-------------------------