२५० कोटीचा फटका बसलेला पोल्ट्री व्यवसाय सावरतोय; दररोज २०० टन विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:49 AM2020-04-28T10:49:22+5:302020-04-28T10:49:29+5:30

दररोजची ही उलाढाल १ कोटी ६० लाख रुपयांची आहे.

poultry business is recovering; 200 tons sold daily | २५० कोटीचा फटका बसलेला पोल्ट्री व्यवसाय सावरतोय; दररोज २०० टन विक्री

२५० कोटीचा फटका बसलेला पोल्ट्री व्यवसाय सावरतोय; दररोज २०० टन विक्री

Next

अकोला: कोरोनाचा संसर्ग कोंबड्यांमध्येही होत असल्याची अफवा पसरल्याने विदर्भातील जवळपास २५० कोटी रुपयांचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. आता पुन्हा या व्यवसायाला उभारी आली असून, दररोज २०० टन बॉयलर कोंबड्यांची मागणी वाढली आहे. दररोजची ही उलाढाल १ कोटी ६० लाख रुपयांची आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. टाळेबंदीचा २८ एप्रिल रोजी ३५ वा दिवस आहे. या काळात सुरुवातीला पोल्ट्री व्यावसायावर परिणाम झाला. टाळेबंदीच्या आधीपासून अफवा पसरल्याने पोल्ट्री व्यवसाय पूर्णत: अडचणीत आला होता. कोंबडी कोणी घेत नसल्याने अनेकांनी पक्षी जमिनीत गाडले तर अनेकांनी लोकांना फुकटात वाटले. त्यामुळे हा व्यवसाय चांगलाच अडचणीत आला. आता पुन्हा हा व्यवसाय उभा राहत असून, कोंबड्यांची मागणी वाढली आहे.

विदर्भात दररोज २०० टन बॉयलर कोंबडीची मागणी वाढली आहे. सध्या कोंबडीचे घाऊक दर प्रतिकिलो ९५ रुपये आहेत. किरकोळ बाजारात हे दर प्रतिकिलो २२५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
अमरावती येथे काँट्रॅक्ट फार्मिंगच्या धर्तीवर कोंबडी निर्मिती, पालन पोषण केले जात आहे. येथूनच संपूर्ण विदर्भाला बॉयलर कोंबडीचा पुरवठा करण्यात येतो. येथे जवळपास दररोज ५ लाख पक्षी या काँट्रॅक्ट फार्मिंगच्या धर्तीवर निर्माण केली जातात. येथे कोंबडी ब्रीडर फार्म आहे. सुरुवातीला आलेल्या अडचणींवर मात करीत ही फार्मिंग पुन्हा जोरात सुरू झाली आहे. कोंबडीमधील प्रोटीन बघता नागरिकही आता कोंबडीची मागणी करीत आहेत. अकोल्यात दररोज २० टन कोंबड्यांची मागणी वाढली आहे. विदर्भात इतरही स्वतंत्र छोटे मोठे पोल्ट्री फार्मस आहेत. जे पूर्णत: बंद पडले होते, तेदेखील आता कास धरीत आहेत; परंतु त्यांचे या व्यवसायात मोठे नुकसान झाले असल्याने शासनाने दखल घेण्याची गरज आहे.


पोल्ट्री व्यवसायाने पुन्हा उभारी घेतली असून, नागरिकांना पोल्ट्रीमधील प्रोटीनचे महत्त्व कळले आहे. म्हणूनच विदर्भात दररोज २०० टन ब्रायलर कोंबड्यांची मागणी वाढली आहे. अकोल्यात तर दररोज २० टन ब्रायलरची मागणी आहे.
डॉ. शरदराव भारसाकळे,
हचरिज,
अमरावती.

 

Web Title: poultry business is recovering; 200 tons sold daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.