दिव्यांगांना दिले बळ अन् दिशा: आर्ट गॅलरीच्या अभिनव प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 04:31 PM2019-02-10T16:31:17+5:302019-02-10T16:32:10+5:30
अकोला: अंध, अपंग, पंगू म्हणून समाजाने हेटाळणी केलेल्या दिव्यांगांना स्वबळावर हिमतीने उभे राहण्याचे बळ आणि रोजगार मिळवून जगण्याची नवी दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य अकोल्यात टीम करीत आहे.
- संजय खांडेकर
अकोला: अंध, अपंग, पंगू म्हणून समाजाने हेटाळणी केलेल्या दिव्यांगांना स्वबळावर हिमतीने उभे राहण्याचे बळ आणि रोजगार मिळवून जगण्याची नवी दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य अकोल्यात टीम करीत आहे. दिव्यांगांच्या एकूणच सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या अकोल्यातील आर्ट गॅलरीने एक नवे अनेक विविध अभिनव असे प्रयोग सुरू केले आहे. या प्रयोगाची दखल राज्यभरात घेतली जात असून, अकोल्यातील दिव्यांग आर्ट गॅलरी दिव्यांगांसाठी आयकॉन ठरत आहे.
दृष्टिहीन असलेले डॉ. विशाल कोरडे स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयातील संगीत विषयाचे प्राध्यापक म्हणून सेवारत आहेत. संगीताचे धडे देताना आणि स्वत: गिरविताना प्रा. कोरडे यांना अनेक समस्या आल्यात. दिव्यांगांच्या समस्या अनंत असून, त्यांच्यासाठी रोजगाराचे आणि शिक्षणाचे नवे दालन खुले करण्याची गरज असल्याचे त्यांना जाणवले आणि सुरू झाला दिव्यांग आर्ट गॅलरीचा प्रवास. दिव्यांग आर्ट गॅलरीने सर्वप्रथम अकोल्यातील दिव्यांगांची नोंद सुरू केली. ही नोंदणी सुरू असताना अनेकांच्या सुप्त संकल्पना समोर आल्यात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने कार्यशाळा बोलाविण्यात आली. अकोल्यातील शेकडो दिव्यांगांनी विविध रंग, आकार आणि प्रकारच्या राख्या तयार केल्यात. त्यांचे प्रदर्शन शहरात भरविण्यात आले. त्यातून अनेकांना रोजगारदेखील मिळाला. त्यानंतर अकोला आर्ट गॅलरीने विविध हस्तकला निर्मिती, प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन केले. त्यालादेखील चांगला प्रतिसाद लाभला. दिव्यांगांची नोंदणी वाढविण्याची यूडी आयडी वितरणाची कार्यशाळा घेतली गेली. ब्रेललिपी लायब्ररीचे गठन करण्यात आले. दिव्यांगांना दृष्टी नसली तरी त्यांना भाषा व जाणिवेतून सृष्टी साकारता येते. म्हणून डॉ. कोरडे यांच्या नेतृत्वात काटेपूर्णा भ्रमंतीचा प्रयोग केला गेला. ल्युइसब्रेलसाठी वाचक आणि लेखणी बँक तयार करण्याची मागणी पुढे आली. दिव्यांग आर्ट गॅलरीच्या माध्यमातून दीडशे स्वयंसेवक पुढे आलेत. दिव्यांगांना रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने विविध प्रयोग राबविले जात असून, दिव्यांगांना आता आॅनलाइन कार्यपद्धतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. यापुढे फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि इतर मार्गदर्शन शिबिर घेतले जात आहे. दिव्यांग आर्ट गॅलरीने अकोल्यात राबविलेल्या विविध अभिनव प्रयोगांची दखल राज्यात घेतली गेली असून, आता राज्यात दिव्यांग आर्ट गॅलरी ठिकठिकाणी स्थापन होत आहे.
निसर्गाने पंगू म्हणून जन्माला घातले असले तरी आम्ही इतर डोळस आणि सुदृढांपेक्षाही सरस असे कार्य करू शकतो. दिव्यांग आर्ट गॅलरीची टीम झपाटल्यागत एकमेकांना सावरून दिव्यांगांना स्वयंरोजगाराचे बळ आणि नव्या दिशा देण्याचे कार्य करीत आहे. खालील ओळी जणू दिव्यांगांच्या जगण्याचे प्रतिनिधित्व करीत आहे...