बायोगॅसवर अकोल्यात वीज निर्मिती प्रकल्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:33 PM2020-01-24T18:33:09+5:302020-01-24T18:33:17+5:30
या प्रकल्पातून दररोज २४ युनिट वीज निर्मिती होत असल्याने विजेच्या बाबतीत हा विभाग स्वयंपूर्ण झाला आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जैववायू (बायोगॅस)चे नवे तंत्रज्ञान विकसित केले असून, या बायोगॅसपासून कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागात वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून दररोज २४ युनिट वीज निर्मिती होत असल्याने विजेच्या बाबतीत हा विभाग स्वयंपूर्ण झाला आहे.
डॉ. पंदेकृविच्या नवीन तंत्रज्ञानातून ३० टक्के जादा जैववायू निर्मिती केली जात आहे. गॅस सिलिंडर व रॉकेलला सक्षम पर्याय असलेल्या या तंत्रज्ञानाच्या प्रसारावर या कृषी विद्यापीठाने भर दिला असून, विविध प्रकारच्या जैववायू मॉडेल्सचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. कौटुंबिक पद्धतीने उभारलेल्या जैववायू सयंत्रामध्ये गायी, बैल, म्हैस इत्यादी प्राण्यांच्या शेणाचा वापर करण्यात येतो. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन जैववायू सयंत्रामध्ये ओले शेण पाचन करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याने हे सयंत्र वर्षभर कार्यरत राहून जैववायू, विजेची गरज पूर्ण करण्याचे काम करीत आहे. या सयंत्राचे डिझाइन, मूल्यांकन, तंत्रज्ञान, कुशलता आदींचे यशस्वी परीक्षण या कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने केले आहे.
५० घनमीटरचे जनता बायोगॅस
डॉ. पंदेकृविच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि विद्युत अभियांत्रिकी विभागांतर्गत राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून येथील पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या प्रक्षेत्रावर ५० घनमीटरचे सुधारित जनता बायोगॅस सयंत्र बांधण्यात आले आहे. यात दररोज एक हजार किलो शेण वापरण्यात येत आहे. याला सहा किलो वॉटचे इंजीन आणि जनिंत्र लावण्यात आले आहे. याला आठ घनमीटर गॅस लागतो. पाच तास हे इंजीन चालते. प्रति तास सहा युनिट वीज यातून निर्माण होत असून, ही वीज गुराचे गोठे व या परिसरात वापरण्यात येत आहे. तीन एचपी पाण्याची मशीनही या बायोगॅसवर चालते.
या सुधारित सयंत्राचा धारणाकाळ सामान्य सयंत्रापेक्षा जास्त असल्यामुळे जैववायू उत्पादनात वाढ झाली आहे. या पाचीत मळी बाहेर येण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. सध्या दिवसाला २४ युनिट वीज निर्मिती होत आहे. कृषी विद्यापीठात हा पथदर्शक प्रकल्प असून, शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे. यातील शेण नंतर सेंद्रिय शेतीसाठी खत म्हणूनही वापरता येते.
- डॉ. सुरेंद्र काळबांडे,
विभाग प्रमुख,
अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि विद्युत अभियांत्रिकी,
डॉ.पंदेकृवि,अकोला.
फोटो -