६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 10:44 AM2021-03-17T10:44:12+5:302021-03-17T10:44:25+5:30
MSEDCL cut Power supply पाणीपुरवठा बंद झाल्याने योजनेंतर्गत खारपाणपट्ट्यातील ६४ खेड्यांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अकोला : जिल्ह्यातील खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे फेब्रुवारी अखेरपर्यंत १ कोटी ४४ लाख रुपयांचे वीज देयक थकीत असल्याने, अखेर वीज वितरण कंपनीमार्फत या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा मंगळवारी खंडित करण्यात आला. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाल्याने योजनेंतर्गत खारपाणपट्ट्यातील ६४ खेड्यांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि खारपाणपट्ट्यातील अकाेला तालुक्यातल्या खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे फेब्रुवारी अखेरपर्यंत २ कोटी १९ लाख रुपयांचे वीज देयक थकीत आहे. थकीत वीज देयकाच्या रकमेचा भरणा न केल्यास दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा इशारा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गत ९ मार्च रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान दिला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेने वीज देयकाचा थकबाकीचा भरणा केला नसल्याने, १ कोटी ४४ लाख रुपयांचे वीज देयक थकीत असलेल्या खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई १६ मार्च रोजी सायंकाळी वीज वितरण कंपनीमार्फत करण्यात आली. वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील ६४ खेड्यांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
४२ कोटींची पाणीपट्टी थकीत
जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन योजनांची फेब्रुवारी अखेरपर्यंत ४२ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. त्यामध्ये ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची ३५ कोटी २८ लाख पाणीपट्टी थकीत असून, केवळ ८ लाख १२ हजार रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे. ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची ७ कोटी ८४ लाख रुपये पाणीपट्टी थकीत असून त्यापैकी केवळ ५५ लाख ६ हजार रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे. पाणीपट्टी वसुलीचे अत्यल्प प्रमाण असल्याने वीज देयकांची रक्कम अदा करण्याचा प्रश्न जिल्हा परिषदेसमोर निर्माण झाला आहे.
वीज देयकाची रक्कम थकीत असल्याने खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीमार्फत १६ मार्च रोजी सायंकाळी खंडित करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.
- अनिस खान
प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद.