आगर येथे वीजपुरवठा खंडित, ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:32+5:302021-06-16T04:26:32+5:30
गत आठवड्यात मोठ्या प्रमाणात हवा व पाऊस आल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली. विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे गावकऱ्यांना अंधारातच रात्र ...
गत आठवड्यात मोठ्या प्रमाणात हवा व पाऊस आल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली. विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे गावकऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागली होती. आता काही कारण नसताना सुद्धा वेळोवेळी गावातील वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाचे वातावरण दिसले की, या भागातील गावांमधील वीजपुरवठा बंद करण्यात येतो. काही दिवसापासून अचानक गावातील व बाजूच्या खेड्यातील वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे बाळंतीण महिलांना व लहान मुलांना डास चावल्याने त्यांच्यामध्ये तापेच्या प्रमाण वाढले आहे. आता पावसाळ्याला सुरूवात झाली असून रात्रीच्या वेळी सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुद्धा धोका वाढला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आगर या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा. अशी मागणी या भागातील ग्रामस्थ करीत आहेत.
या भागातील महावितरणचे कर्मचारी कामामध्ये हलगर्जीपणा करीत आहेत. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे
-शिवशंकर डिक्कर, उपसरपंच कंचनपूर
दोन-तीन दिवसांपासून गावामध्ये एक ते दोन तास वीजपुरवठा असतो. नंतर रात्री वीजपुरवठा बंद राहतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
-निशांत कांबरकर, ग्रामस्थ आगर