पिंजर परिसरात वीज पुरवठा खंडित; नागरिक वैतागले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:21 AM2021-09-23T04:21:28+5:302021-09-23T04:21:28+5:30
निहिदा: पिंजर येथील वीज कंपनीच्या मनमानी कारभाराला नागरिक वैतागले आहेत. तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली दिवसातून १० ते १५ वेळा वीज ...
निहिदा: पिंजर येथील वीज कंपनीच्या मनमानी कारभाराला नागरिक वैतागले आहेत. तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली दिवसातून १० ते १५ वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. याकडे वरिष्ठांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
पिंजर येथे दोन कर्मचारी कार्यरत असून, मनमानी कारभार सुरू आहे. गावातील दुरुस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा वारंवार खंडित केला जात असल्याचे चित्र आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम त्वरित आटोपून दिवसभर वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास सांगितले आहे; मात्र कर्मचारी दररोज १० ते १५ वेळा वीज पुरवठा बंद करीत असल्याने नागरिक वैतागले आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता उद्धट वागणूक दिली जाते. गावातील लोकसंख्या जवळपास २० हजारांवर असून, दररोज तक्रारी वाढत आहेत. तक्रारींची तात्काळ दखल घेतल्या जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
----------------------
गावातील ग्रामस्थांनी केलेल्या सूचनेनुसार, कामे करण्यासाठी काही वेळासाठी वीज पुरवठा खंडित करावा लागतो.
-देवीदास जाधव, मुख्य लाईनमन पिंजर.
--------------------
दिवसातून १० वेळा ‘बत्ती गुल’
पिंजर येथील वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विजेच्या समस्या वाढल्या आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली गावांतील वीज पुरवठा दिवसांतून १० ते १५ वेळा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.