पनोरी येथे विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:18 AM2021-04-13T04:18:12+5:302021-04-13T04:18:12+5:30
अकोटः गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील पनोरी येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. याकडे महावितरणच्या ...
अकोटः गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील पनोरी येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत तक्रार करूनही समस्या जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
-----------------------
दिग्रस बु.-चान्नी फाटा रस्त्यावर वृक्षतोड
वाडेगाव: पातूर तालुक्यातील चान्नी फाटा-दिग्रस बु. रस्त्याचे काम नुकतेच झाले आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात झाडे असून, त्याच्या फांद्या वाढल्या आहेत. अपघाताची संभावना लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे.
-----------------------------
निंबा फाटा येथे गतिरोधक निर्माण करण्याची मागणी
हाता : येथून जवळच असलेल्या निंबा फाटा येथील रस्त्यांवर अपघाताची शक्यता लक्षात घेता, गतिरोधक निर्माण करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे. शेगाव-अकोट या रस्त्याचे काम सुरू असून, या मार्गावरून हजारो वाहने प्रवास करतात. निंबा फाट्यावर प्रवाशांची व वाहनांची भरपूर वर्दळ असते.
----------------------------
महिला लाभार्थ्यांना कोंबड्यांचे वाटप
बोरगाव मंजू: अकोला जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून बोरगाव मंजूतील पशुवैद्यकीय रुग्णालयायत जिल्हा परिषद सदस्य नीता संदीप गवई यांच्या हस्ते गावातील सर्वसाधारण लाभार्थ्यांना कावेरी जातीच्या कोंबड्यांचे वाटप सोमवारी करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून बोरगावमंजूत सहा महिला लाभार्थ्यांना प्रत्येकी २५ मादी आणि ३ नर कोंबड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नीतू गवई, पशुवैद्यकीय रुग्णालयालतील कर्मचारी अशोक वानखडे, इलियास भाई उपस्थित होते.
--------------------------------------
खांबदेव महाराज यात्रा महोत्सव रद्द
खिरपुरी बु.: येथील ग्रामदैवत श्री खांबदेव महाराज यात्रा महोत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन व्यवस्थापक पांडुरंग यशवंतराव दांदळे यांनी केले आहे.
--------------------------
वीजतारा लोंबकळल्या!
मनात्री: तेल्हारा तालुक्यातील मनात्री खुर्द येथे गेल्या काही दिवसांपासून वीजतारा लोंबकळलेल्या असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. येथील वार्ड क्रमांक १ मध्ये वीजतारा घरावर झुकल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही स्थिती जैसे थे आहे.
------------------------------------------------------------
वीज खांब देत आहे अपघाताला आमंत्रण
बार्शीटाकळी : शहरातील काही भागांमध्ये अनेक वर्षांपासून वीज खांब उभा आहे. मात्र, या खांबाला खालच्या भागाला गंज चढल्यामुळे खांब पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे. एखाद्या वेळी खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.
-------------------------------------
शेतशिवारात उष्णतेने शुकशुकाट
चोहोट्टाबाजार : परिसरात वातावरण चांगलेच तापू लागल्याने, वाढत्या तापमानामुळे दुपारी शेतशिवारात सर्वत्र शुकशुकाट राहत असल्याचे चित्र असून, शेतकऱ्यांकडून सकाळीच शेतीकामे उरकवून त्वरित माघारी फिरण्यावर भर दिल्या जात आहे
--------------------------------------
कंचनपूर-लोणाग्रा रस्त्याची दुरवस्था
हातरूण : कंचनपूर-लोणाग्रा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या मार्गाने अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात येत आहे.
-------------------------------------------------------------------
अकोट तालुक्यात रविवारी रात्री वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अकोट-लोहारी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास बाभळीचे झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. (छाया: विजय शिंदे)