८४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा पुन्हा खंडीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 10:31 IST2021-03-25T10:31:04+5:302021-03-25T10:31:20+5:30
Power supply cut off again! ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा पुन्हा बुधवारी खंडित करण्यात आला.

८४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा पुन्हा खंडीत!
अकोला: वीज देयकाची रक्कम थकीत असल्याने, ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा पुन्हा बुधवारी खंडित करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्गत ७७ गावांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली.
जिल्ह्यातील खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन योजनांची वीज देयकाची २ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम थकीत असल्याने , गत १६ मार्च रोजी ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा आणि १८ मार्च रोजी ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीमार्फत खंडित करण्यात आला होता. थकीत वीज देयकाच्या रकमेचा भरणा लवकरच करण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिल्यानंतर दोन्ही पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा १९ मार्च रोजी वीज वितरण कंपनीमार्फत पुर्ववत करण्यात आला होता.परंतू २५ लाख रुपये वीज देयकाची रक्कम अध्याप थकीत असल्याने वीज वितरण कंपनीमार्फत ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा २४ मार्च रोजी पुन्हा खंडित करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्गत ७७ गावांमध्ये जलसंकटाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
२५ लाख रुपये वीज देयकाची रक्कम थकीत असल्याने, वीज वितरण कंपनीमार्फत ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा बुधवारी दुपारी खंडित करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा बंद झाला.
-अनिस खान
प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद.