थकबाकीदार १८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 11:03 AM2021-09-18T11:03:08+5:302021-09-18T11:03:08+5:30
Power supply disconnected : वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीज ग्राहकांकडे ४२ कोटी रुपयांची थकबाकी होती.
अकोला : वारंवार आव्हान करूनही वापरलेल्या वीज देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणच्याअकोला परिमंडळातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील सुमारे १८ हजार वीज ग्राहकांना झटका देत महावितरणने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीज ग्राहकांकडे ४२ कोटी रुपयांची थकबाकी होती.
१० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असलेले वीज ग्राहक महावितरणच्या रडारवर असून, अशा थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व्यापक मोहीम अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात ५३ हजार ३९० वीज ग्राहकांकडे ११३ कोटी ६६ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात अकोला जिल्ह्यात २० हजार ४१५ वीज ग्राहकांकडे ४४ कोटी ११ लाख रुपये, बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २५ हजार ५८७ वीज ग्राहकांकडे ५१ कोटी ७६ लाख रुपये, वाशिम जिल्ह्यात ७ हजार ३८८ वीज ग्राहकांकडे १७ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी आहे. अकोला शहर उपविभाग क्रमांक १ मध्ये ३७१२ वीज ग्राहकांकडे ८ कोटी ५३ लक्ष रुपयांची थकबाकी होती. यातील ७१६ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. या वीज ग्राहकाकडे २ कोटी २१ लाख रुपयांची थकबाकी आहे. अकोला शहर उपविभाग २ आणि ३ मध्ये अनुक्रमे २१४९ आणि १४८८ वीज ग्राहकाकडे ११ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी आहे. यातील उपविभाग क्रमांक २ मध्ये ४८६ आणि उपविभाग क्रमांक ३ मध्ये ४९७ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अकोला ग्रामीण उपविभागात ६६ वीज ग्राहकांकडे १ कोटी ५१ लाख रुपयाची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. बाळापूर उपविभाग ३८९ वीज ग्राहकांचा, बार्शी टाकली उपविभागात ४२२ वीज ग्राहकांचा, मूर्तिजापूर उपविभागात ४६८ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वीजपुरवठा खंडित केल्यावर राहणार वॉच
वीज देयकाच्या थकबाकीमुळे या वीज ग्राहकांचा पुरवठा सध्या तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला असला तरी हे वीज ग्राहक आकडा टाकून; अथवा शेजाऱ्याकडून वीजपुरवठा तर घेत नाहीत ना, याची पडताळणी करण्यासाठी वेगळे पथक नियुक्त केले आहे. जर वीज ग्राहक आकडा टाकून वीजचोरी करताना आढळल्यास त्याच्याविरोधात थेट वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.
एकाच दिवशी ९५८ ग्राहकांना झटका
गुरुवार दिनांक १६ सप्टेंबर या एकाच दिवशी एकट्या अकोला जिल्ह्यात ९५८ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदार वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणकडून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.