महान जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठा खंडित
By admin | Published: September 6, 2016 02:24 AM2016-09-06T02:24:37+5:302016-09-06T02:24:37+5:30
खंडित वीजपूरवठय़ामुळे अकोला शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
अकोला, दि. ५: शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठा सोमवारी तब्बल चार वेळा खंडित झाला. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांमध्ये महावितरण कंपनीप्रती नाराजीचा सूर उमटत आहे. अकोलेकरांना महान धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तत्पूर्वी तेथील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतरच शहरातील जलकुंभापर्यंत पाणी पोहोचविल्या जाते. अ त्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेला पाणीपुरवठा सुरळीत राहणे अपेक्षित आहे. महान ते अकोला पर्यंतच्या मार्गावरील जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. यावेळी मात्र जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठय़ाचे वेळा पत्रक कोलमडण्याचा प्रकार समोर आला आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी सोमवारी जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा तब्बल चार वेळा खंडित झाल्याची बाब समोर आली. परिणामी महापालिकेला पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात अंशत: बदल करावा लागला आहे. एक्स्प्रेस फिडरचा फायदा काय? जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी एक्स्प्रेस फिडरची व्यवस्था करण्यात आली आहे. असे असताना वीजपुरवठा खंडित होणे अपेक्षित नाही; मात्र ग्रामीण भागात विजेचा वा पर वाढल्याची सबब पुढे करीत जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठय़ावर परिणाम होत असल्याचा तर्कहीन मुद्दा महावितरण कंपनीकडून उपस्थित केला जात असल्याची माहिती आहे. या भागात सिंचनासाठी विजेचा वापर वाढत असला तरी एक्स्प्रेस फिडरमुळे जलशुद्धीकरण केंद्रावर त्याचा परिणाम होणे अपेक्षित नाही, हे तेवढेच खरे.