सर्वोपचार रुग्णालयातील बत्ती गूल; ओपीडीतील रुग्णसेवा प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:50 AM2019-08-20T11:50:10+5:302019-08-20T11:50:16+5:30
सर्वोपचार रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सोमवारी रुग्णसेवा प्रभावित झाली होती.
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सोमवारी रुग्णसेवा प्रभावित झाली होती. दरम्यान, एक्स-रे, सोनोग्राफी यासह इतर तांत्रिक तपासणीमध्ये रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागला असून, रुग्णांना तपासणीसाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.
सर्वोपचार रुग्णालयात सोमवारी सकाळपासूनच विविध तपासणींसाठी रुग्णांनी गर्दी केली होती. अशातच सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक रुग्णालयातील बत्ती गूल झाली. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर दिसून आला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू झाला; परंतु सकाळी १० वाजतापासून वीज नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली होती. विशेषत: एक्स-रे, सोनोग्राफी यासारख्या तांत्रिक तपासणीदेखील प्रभावित झाल्या असून, इतरही वॉर्डातील रुग्णसेवा प्रभावित झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, काही क्षणांसाठी अतिदक्षता विभागही प्रभावित झाला होता. हीच स्थिती जळीत कक्ष आणि बाल रुग्ण विभागातही दिसून आली. विद्युत पुरवठा नसल्याने सोमवारी एक्स-रे, सोनोग्राफी वॉर्ड पूर्णत: ठप्प पडले होते. त्यामुळे रुग्णांना तांत्रिक तपासणीसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागले होते.
जीएमसीत एकच तंत्रज्ञ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्युत यंत्रणा हाताळण्यासाठी एकच तंत्रज्ञ कार्यरत आहे. या एकाच तंत्रज्ञावर संपूर्ण महाविद्यालय व रुग्णालयातील विद्युत यंत्रणेची जबाबदारी आहे. रिक्त पदामुळे या एकाच तंत्रज्ञानाला दिवसा आणि रात्रीची जबाबदारी सांभाळावी लागते.
महावितरणमार्फतच हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. रुग्णालयातील विद्युत यंत्रणेमध्ये कुठलाच बिघाड झालेला नाही. दुपारी ३ वाजताच्या सुमारास वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाल्याने रखडलेली कामे पूर्ववत सुरू करण्यात आली.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला