अत्यावश्यक सेवेतील वीज कर्मचारी लसीकरणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:18 AM2021-05-13T04:18:10+5:302021-05-13T04:18:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना अद्यापही फ्रंटलाईन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना अद्यापही फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळालेला नाही. कोविड -१९च्या सुरु असलेल्या लसीकरण केंद्रात फ्रंटलाईन वर्कर म्हणून वीज कर्मचाऱ्यांचा उल्लेख नसल्याची बाब समोर आली आहे.
कोरोनाची साखळी तुटावी म्हणून शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आणि नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले. त्यावेळी घरी बसलेल्या नागरिकांना मनोरंजन आणि वातानुकूलित व्यवस्था गरजेची होती. त्याकरिता वीज आवश्यक बाब आहे. ही वीज सेवा अखंडित सुरू ठेवण्यासाठी वीज कर्मचारी अविरत काम करत आहेत.
महावितरणचे तंत्रज्ञ आणि वीज कर्मचारी आपली नियमित देखभाल, दुरुस्तीची कामे, वसुलीची कामे लॉकडाऊनमध्ये करत आहेत. ही कामे करताना त्यांचा प्रत्यक्ष लोकांशी संपर्क येतो. अशा कर्मचार्यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. तसेच वीज कर्मचाऱ्यांना वाहिनीच्या पेट्रोलिंग व देखभाल, दुरुस्तीसाठी सतत फिरावे लागते. अशावेळी त्यांचा संपर्क इतर कर्मचाऱ्यांशी येतो. या कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊनच्या आपत्कालिन परिस्थितीतही वीज कर्मचारी काम करत आहेत. मात्र, त्यांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स... लसीकरणाची अंमलबजावणी नाही
फ्रंटलाईन वर्करमध्ये आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मात्र, वीज कर्मचाऱ्यांना अद्यापही फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात आलेला नाही तसेच लससुद्धा देण्यात आलेली नाही. आरोग्य विभागाने एक पत्र काढून तिन्ही वीज कंपनीतील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्राधान्याने लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, याबाबतची कोणतीही अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही.
बॉक्स... अकाेल्यातील २६ कर्मचाऱ्यांची काेकणात सेवा
कोकणात जून २०२०मध्ये निसर्ग चक्रीवादळ आले होते. या वादळाने कोकणातील शेकडो गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. गावातील विजेचे खांब उन्मळून पडले होते. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अकोला परिमंडळातून २६ जणांचा चमू कोकणात पाठविण्यात आला होता. या वीज कर्मचाऱ्यांनी पंधरा दिवस अहोरात्र काम करून मदत केली. त्यानंतर यापैकी चारजणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
बॉक्स ...
वर्षभरात तिघांचा काेराेना बळी
महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळात म्हणजेच अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यांत वर्षभरात २२७ कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत तर सध्या ४७ सक्रिय रुग्ण आहेत तर तीनजणांचा मृत्यू झाला आहे. महापारेषण कंपनीतही अशीच स्थिती आहे.
काेट....
कोरोनाच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता, अहोरात्र झटणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा आणि कोविड - १९च्या लसीकरण मोहिमेत प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन इंटक या संघटनेने केली आहे.
गोपाल गाडगे सर्कल सचिव इंटक
काेट..
वीज कर्मचाऱ्यांना अद्यापही फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केलेले नाही आणि लसीकरणामध्ये प्राधान्यसुद्धा दिलेले नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून, त्यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आम्ही वर्कर्स फेडरेशनतर्फे १७ मे रोजी राज्यभर आंदोलन छेडू, असा इशारा संघटनेतर्फे दिला आहे.
- कॉ. कृष्णा भोयर, सरचिटणीस
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन