निराधार कुटुंबाला घर बांधून देण्याचा ‘प्रहार’चा संकल्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:24 AM2021-08-20T04:24:18+5:302021-08-20T04:24:18+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील वाहळा बु. येथे सचिवाच्या दिरंगाईमुळे पाच दिवसांपासून वाऱ्यावर असलेल्या निराधार कुटुंबांना घर बांधून देण्याचा प्रहार ...
खेट्री : पातूर तालुक्यातील वाहळा बु. येथे सचिवाच्या दिरंगाईमुळे पाच दिवसांपासून वाऱ्यावर असलेल्या निराधार कुटुंबांना घर बांधून देण्याचा प्रहार संघटनेने संकल्प केला आहे. तसेच पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांनीसुद्धा पुढाकार घेऊन गुरुवारी १९ ऑगस्ट रोजी कुटुंबाला राहण्याची पर्यायी व्यवस्था करून तत्काळ ५ हजार रुपये तसेच अन्नधान्याची मदत केली. त्यामुळे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
वाहळा बु. येथील १२ वर्षीय सानिका दत्ता फाळके हिला सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. दुसऱ्या दिवशी लहान मुलींना त्याच घरात पुन्हा सर्प दिसून आल्याने सर्पाच्या शोधात दत्ता फाळके व गावातील काही जणांनी दगड मातीच्या भिंती पाडून टाकल्या; परंतु सर्प आढळून आला नाही; मात्र दत्ता फाळके यांच्या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने कुटुंबाचे हाल होत होते. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाला राहण्याची पर्यायी व्यवस्था करून देण्याचे काम स्थानिक प्रशासनाचे होते; परंतु ग्रामसचिवांच्या दिरंगाईमुळे ५ दिवसांपर्यंत राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांनी दखल घेऊन नायब तहसीलदार सय्यद ऐहसांनोद्दीन, तलाठी हातेकर, डाबेराव, लाड यांना पाठवून कुटुंबाला राहण्याची पर्यायी व्यवस्था व तत्काळची ५ हजार रुपये व अन्नधान्याची मदत केली. तसेच पालकमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात प्रहारचे सेवक अरविंद पाटील, शुभम थिटे, शुदनेश साखरे, ओम वानखडे, सतीश नेवाल, प्रल्हाद पाटील आदींनी निराधार कुटुंबाच्या घरी भेट देऊन घर बांधण्याचा संकल्प केला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत घराचे बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन निराधार कुटुंबाला प्रहार संघटनेकडून देण्यात आले आहे.