Old pension scheme : जुनी पेन्शनसाठी प्रहार शिक्षक संघटना सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2023 05:31 PM2023-03-11T17:31:57+5:302023-03-11T17:32:13+5:30
Old pension scheme : शिक्षकांच्या हितासाठी प्रहार शिक्षक संघटनाही सरसावली असून, संघटनेचे सर्व सदस्य या संपात सहभागी होणार आहेत.
अकोला : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूवर्वत लागू करण्याच्या मागणीसाठी १४ मार्च रोजी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. शिक्षकांच्या हितासाठी प्रहार शिक्षक संघटनाही सरसावली असून, संघटनेचे सर्व सदस्य या संपात सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने माहे नोव्हेंबर २००५ व त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे. या कालावधीनंतर रुजू झालेल्या सर्व नवीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाच लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून विविध स्तरावर निवेदन, मोर्चा, आंदोलने करुन ही राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या सदर मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न करता आजपर्यंत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्याचे निषेधार्थ राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने दिनांक १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आपल्या हक्कासाठी आणि आपल्या कुटुंबाचे भविष्यासाठी जुनी पेन्शनसाठी सदर संपात सक्रिय सहभाग द्यावा असे आवाहन प्रहार शिक्षक संघटनेचे मंगेश टीकार, प्रवीण गायकवाड यांनी केले आहे.
प्रहार शिक्षक संघटनेचे बहुतांश सभासद हे २००५ नंतर सेवेत दाखल झालेले असल्यामुळे व कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, हीच प्रहार शिक्षक संघटनेची भूमिका आहे.
- प्रवीण गायकवाड, अकोला तालुका अध्यक्ष,प्रहार शिक्षक संघटना