ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा केंद्राचा घाट, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 05:41 AM2020-07-07T05:41:57+5:302020-07-07T05:42:46+5:30
आॅल इंडिया फेडरेशन आॅफ अदर बॅकवर्ड क्लासेसनी विस्तृत अशी आकडेवारी जाहीर करून ओबीसी आरक्षण संपविण्याचा केंद्राचा घाट उघड केला आहे.
अकोला : केंद्र सरकार हे ओबीसींविरोधी सरकार आहे. त्यामुळेच ओबीसींसाठी राखीव असलेल्या वैद्यकीय जागेवर या समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. २०१७ पासून ते आजपर्यंत या धोरणामुळे ११ हजार ओबीसीचे विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून,आरक्षणाअभावी वंचित राहिले आहेत, असा आरोपवंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला.
स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, ओबीसीला कायद्यानुसार दिलेले २७ टक्के आरक्षणाची पूर्तता ‘नीट’द्वारे दिलेल्या वैद्यकीय प्रवेशामध्ये झालेली नाही. देशपातळीवरील आॅल इंडिया फेडरेशन आॅफ अदर बॅकवर्ड क्लासेसनी विस्तृत अशी आकडेवारी जाहीर करून ओबीसी आरक्षण संपविण्याचा केंद्राचा घाट उघड केला आहे.
आंदोलनाचा इशारा
वैद्यकीय प्रवेशासंदर्भातील अन्याय सरकारने तत्काळ दूर करावा, अन्यथा वंचितच्या बॅनरखाली हे आंदोलन करणार असून, जेवढे आरक्षणवादी आहेत, ते सर्व या आंदोलनाला पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.