धम्म मेळाव्यात उसळला भीमसागर, प्रकाश आंबेडकरांनी लावली हजेरी
By राजेश शेगोकार | Published: October 6, 2022 07:08 PM2022-10-06T19:08:29+5:302022-10-06T19:08:46+5:30
अकोल्यात धम्म मेळाव्याला प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली.
अकोला : विजयादशमीच्या दुसऱ्या दिवसी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात गेल्या ३८ वर्षांपासून धम्म मेळाव्याचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात येते. कोरोनाच्या संकटामुळे धम्म मेळावा शांततेत साजरा करण्यात आला. मात्र आता गेल्या दोन वर्षांनंतर आयोजित धम्म मेळाव्यात यंदा आंबेडकरी अनुयायांनी अलोट गर्दी केली होती. विशाल, उचंबळणारा, गर्जना करणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर राज्यभरातून धम्म मेळाव्यात आला होता. वंचित बहूजन आघाडीचे संस्थापक ॲड. प्रकाश आंबेडकर हे सजविलेल्या धम्मरथावर विराजमान झाले होते.
धम्म मेळाव्याच्या रॅलीला सुरुवात झाल्यानंतर गुरुवारी दुपारी ४.१० वाजता पावसाने हजेरी लावली. भरपावसात जय बुद्ध व जयभीमच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले. हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे धम्म मेळाव्याच्या रॅलीत सहभागी झाले होते. लाखो अनुयायांच्या गर्दीने क्रिकेट क्लबचे मैदान फुलून गेली. युवकांच्या झुंडीच्या झुंडी ‘जयभीम’चा नारा देत गर्दीत सामील झाली होती. गर्दी अफाट असली तरी सर्वच एकमेकांना सांभाळून घेत चिमुकल्यांपासून थोरांपर्यंत धम्म मेळाव्यात उत्साहाने सहभागी झाले.