शहिदांच्या बलिदानाचा भाजपाकडून राजकारणासाठी होत असलेला वापर दुर्दैवी- प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 11:12 AM2019-03-11T11:12:58+5:302019-03-11T11:13:50+5:30
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेतली आहे.
अकोला- भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शहीद जवानांच्या बलिदानाचा भाजपा राजकारणासाठी वापर करत असल्याचं दुर्दैवी आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात 12 सर्जिकल स्ट्राइक केले, असा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला होता. त्यांनी त्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे द्यावेत, कुठे केलेत आणि कधी केलेत हेही सांगावे, असंही आंबेडकर म्हणाले आहेत.
भाजपाने राजनाथ सिंह यांच्या माध्यमातून आम्ही तीन सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा केला. राजनाथ सिंह यांनी उरलेले दोन सर्जिकल स्ट्राइक कुठे केलेत तेसुद्धा जनतेला सांगावे, सर्जिकल स्ट्राइकच्या नावावर देशभरात राजकारण सुरू आहे, असे राजकारण होऊ नये असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही काँग्रेस आणि भाजपा दुर्दैवाने, असे राजकारण करत असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. विदर्भातील सर्व मतदारसंघांची निवडणूक एकत्रित पहिल्या टप्प्यात घ्यावी, असं निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.