बच्चू कडू यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी राज्यपालांची परवाणगी मागणार - प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 09:02 PM2022-01-29T21:02:12+5:302022-01-29T21:03:25+5:30
Prakash Ambedkar to meet Governor : आठवडाभरात राज्यपालांची भेट घेऊन मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अकोला : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत नियमाला डावलून काही कामे मंजूर केल्याप्रकरणी पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी परवानगी देण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात आठवडाभरात राज्यपालांची भेट घेऊन मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण रस्त्यांची काही कामे पालकमंत्र्यांनी स्वत:च्या अख्त्यारीत मंजूर करून घेतली. यासंदर्भात वारंवार सांगूनही त्यांचा मनमानी कारभार सुरू होता, असा आरोप करीत या गैरकारभाराच्या विरोधात शेवटी वंचित बहुजन आघाडीने आवाज उठविला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईसाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे यासंदर्भात ॲड. आशिष देशमुख यांच्या वतीने अकोला न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (न्यायालय क्र.२) यांनी २७ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार आम्ही केलेल्या तक्रारीत तथ्य असून, या प्रकरणात अनियमितता झाल्याचे सकृतदर्शनी गृहीत धरण्यात आले आहे, असे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले, तसेच कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध (पब्लिक सर्व्हंट) तक्रार करायची असल्यास राज्यपालांची परवानगी घेणे आवश्यक असून, ९० दिवसांत परवानगी मिळणे अपेक्षित असून, या कालावधीत परवानगी न मिळाल्यास कायद्यानुसार परवागी देण्यात आल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. त्यानुषंगाने येत्या आठवडाभरात आपण राज्यपालांची भेट घेणार असून, पालकमंत्र्यांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी परवानगी देण्याची मागणी करणार असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, ॲड. आशिष देशमुख, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे आदी उपस्थित होते.