महाविकास आघाडीने जागा वाटपाचा समझोता जाहीर करावा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी
By संतोष येलकर | Published: February 23, 2024 07:34 PM2024-02-23T19:34:19+5:302024-02-23T19:34:40+5:30
अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तीनही पक्षांनी त्यांच्यात झालेल्या राज्यातील जागा वाटपाचा समझोता जाहीर करुन, त्यामध्ये आमच्या पक्षाच्या जागा कोणत्या पक्षाच्या कोट्यात गेल्या, याबाबतची माहिती दोन दिवसांत लेखी स्वरुपात किंवा माध्यमांद्वारे द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिली. अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाविकास आघाडीतील संबंधित तीन प्रमुख पक्षांमध्ये राज्यातील कोणकोणत्या जागांचा समझोता झाला, याबाबतची भूमिका तीनही पक्षांनी जाहीर करावी तसेच समझोत्यानुसार कोणत्या जागा कोणत्या पक्षाच्या कोट्यात गेल्या, याबाबतची माहिती आम्हाला लेखी स्वरुपात द्यावी किंवा माध्यमांव्दारे दिली तरी चालेल, असे अॅड.आंबेडकर म्हणाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, अॅड.नरेंद्र बेलसरे, विकास सदांशिव, पराग गवइ, सिध्दार्थ सावदेकर आदी उपस्थित होते.
तिघांचे जागा वाटप ठरल्यावर आम्ही वाटाघाटी करु !
महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे जागा वाटप ठरल्यानंतर आणि कोणता पक्ष कोणकोणत्या जागा लढविणार हे कळल्यानंतर आम्ही आमच्या जागांसंदर्भात वैयक्तिकरित्या तीन पक्षांसोबत वाटाघाटी करुन जागांची मागणी करणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
मसुदा काँग्रेसने स्वीकारला; त्यांचाही मसुदा शेअर करावा !
वंचित बहुजन आघाडीचा ३९ मुद्दयांचा मसुदा स्वीकारल्याचे काँग्रेसचे नेत चेन्नीथला यांनी जाहीर केले. आमचा मसुदा महाविकास आघाडीने मान्य केला असून, आता महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षांनीही त्यांचा मसुदा आम्हाला शेअर करावा, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.