‘प्रकाश आंबेडकरांची ‘महाराष्ट्र बंद’ची भूमिका घटनाबाह्य’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 07:07 AM2020-01-21T07:07:17+5:302020-01-21T07:07:40+5:30
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सीसीए, एनसीआर व इतर मुद्द्यांवर २४ जानेवारी रोजी पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ घटनाबाह्य आहे.
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सीसीए, एनसीआर व इतर मुद्द्यांवर २४ जानेवारी रोजी पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ घटनाबाह्य आहे. तसेच हा बंद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाविरुद्ध आहे, असे मत समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक अॅड़ प्रा. मुकुंद खैरे यांनी पत्रकारपरिषदेत व्यक्त केले.
खैरे यांनी सांगितले की, बाबासाहेब आंबेडकरांनी घटना सभेतील भाषणात बंद पाळणे, रस्ते अडविणे, जाळपोळ करणे आदी प्रकारची आंदोलने संविधानाला अर्थातच लोकशाहीला कमजोर करतात. यामुळे देशात अराजकता, बेबंदशाही निर्माण होते. त्याचा परिणाम संविधानावरील लोकांचा विश्वास कमी होईल, आज नागरिकत्व कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात २२ जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. यानंतर सर्वोच्य न्यायालयाने जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. घटनेनुसार सरकारचा कायदा वैध की अवैध ठरविण्याचा अंतिम अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, असे असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी अॅड. प्रकाश आंबेडकरांनी बंद पुकारला आहे, असा आरोप अॅड़ खैरे यांनी केला.
या मुद्द्याला पुष्टी देत खैरे म्हणाले की, मागे भीमा कोरेगावप्रकरणी अॅड़ आंबेडकरांनी पुकारलेल्या बंदमुळे २२ हजार आंबेडकरी तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते.