३ हजार २०२ उमेदवारांनी दिली एमपीएससी पूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 06:39 PM2021-03-21T18:39:08+5:302021-03-21T20:13:21+5:30
MPSC EXAM : रविवार, २१ मार्च रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जिल्ह्यात रविवार, २१ मार्च रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील १८ उपकेंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा केंद्रांवर कोविड प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आल्या होत्या. त्याकरिता परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांना बदलून त्यांच्या ऐवजी अतिरिक्त कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. १८ उपकेंद्रांवर ३ हजार २०२ उमेदवारांनी परीक्षा दिली. प्रत्येक उपकेंद्रावर बेसिक कोविड किट, परीक्षेकरिता उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवारास हातमोजे, मास्क, सॅनिटायझर दिल्या गेले. तसेच परीक्षेकरिता नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने फेसशिल्ड, हातमोजे, मास्क व सॅनिटायझरचा वापर केला. सोशल डिस्टन्सिंग ठेवत विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.