पूर्वहंगामी बीटी कापूस बियाणे १५ मे नंतर मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:54 PM2018-04-28T14:54:34+5:302018-04-28T14:54:34+5:30
जिल्ह्यात बीटी कापसाचे बियाणे पुरवठा १५ मेनंतरच करण्याची तयारी आहे. पेरणीच्या काळात बाजारात बियाणे नसल्याने शेतकऱ्यांना त्याची पेरणी करता येणार नाही.
अकोला : बोंडअळीच्या हल्ल्याने गारद होणारे कापसाचे पीक वाचविण्यासाठीचा प्रयत्न म्हणून यावर्षी पूर्वहंगामी कापसाची पेरणी होऊच द्यायची नाही, असे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यात बीटी कापसाचे बियाणे पुरवठा १५ मेनंतरच करण्याची तयारी आहे. पेरणीच्या काळात बाजारात बियाणे नसल्याने शेतकऱ्यांना त्याची पेरणी करता येणार नाही.
पश्चिम विदर्भात महत्त्वाचे पीक असलेल्या कापूस पिकाला गेल्यावर्षी बोंडअळीने चांगलाच हिसका दाखविला. विशेष म्हणजे, बीटी कापूस बियाणे असतानाही पिकावर बोंडअळीचा हल्ला झाला, ही बाब त्यापेक्षाही भयंकर घडली. या प्रकाराने सर्वच कापूस उत्पादक शेतकरी गर्भगळीत झाले. शासनाने बोंडअळीने नुकसान झालेल्या कापूस पिकाला मदत देण्याची घोषणा केली. दरम्यानच्या काळात बोंडअळीचा हल्ला रोखणे, कीटकनाशकांचा वाजवी वापर करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. त्यानुसार प्रत्येक टप्प्यावर खबरदारी घेण्याचा पवित्रा शासनाच्या कृषी विभागाने घेतला आहे.
पूर्वहंगामी कापूस पिकाची पेरणी केल्यास किडींच्या जीवनचक्रानुसार या पिकावर त्यांचे पोषण होण्याएवढा काळ उपलब्ध होतो. त्या पोषक काळात त्यांचा टिकाव लागल्यास पुढील काळात पेरणी झाल्यास इतर पिकांवर हल्ला करण्यास कीड सक्षम होते. त्या किडीचे जीवनचक्र बाधित करण्यासाठी कापसाची पूर्वहंगामी पेरणी रोखणे आवश्यक असल्याचा उपाय शासनाकडून केला जात आहे. पावसाच्या पाण्यावर उगवलेल्या पिकांमध्ये किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी असते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यानुसार सिंचनाच्या पाण्यावर कापूस पिकाची पेरणी रोखली जात आहे. त्यासाठी दरवर्षी बीटी कापूस बियाणे १५ मेपर्यंत बाजारात बियाणे उपलब्ध केले जाते. यावर्षी ते मिळणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकºयांना पूर्वहंगामी पेरणीसाठी आवश्यक काळात बियाणे बाजाराबाहेर ठेवले जाणार आहे.
गेल्यावर्षी जिल्ह्यात कापसाची पेरणी १ लाख ४२ हजार ४८२ हेक्टरवर झाली होती. यावर्षी ती १ लाख २० हजार हेक्टरवर होणार असल्याचा अंदाज आहे. त्यासाठी २७०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. त्यापैकी २६९५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा खासगी कंपन्यांकडून होणार आहे. गुलाबी बोंडअळीच्या परिणामाने ही घट होण्याचा अंदाज आहे.