अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात मान्सूनपूर्व तयारीचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:03 AM2021-06-12T11:03:37+5:302021-06-12T11:03:47+5:30
Akola News : जिल्ह्यातील ग्रामीण भागात मान्सूनपूर्व तयारीच्या कामांचा बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर येत आहे.
- संतोष येलकर
अकोला : पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ग्रामीण भागात नाल्यांची सफाई आणि पाणीपुरवठा योजनांच्या जलवाहिन्यांवरील गळत्या (लिकेज) दुरुस्तीची कामे ग्रामपंचायतींनी करणे आवश्यक आहे. मात्र, पावसाळा सुरू झाला असला, तरी या कामांकडे कानाडोळा करण्यात आल्याने, जिल्ह्यातील ग्रामीण भागात मान्सूनपूर्व तयारीच्या कामांचा बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर येत आहे.
पावसाळ्यात जलजन्य व साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ग्रामीण भागात गावातील नाल्यांची सफाई, पाणीपुरवठा उद्भवाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तपासणी करून उपाययोजना करणे, पाणीपुरवठा योजनांच्या जलवाहिनींवरील गळत्यांची दुरुस्ती करणे, स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करणे व त्यासाठी गुणवत्तापूर्ण ब्लिचिंग पावडर मुबलक प्रमाणात ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध ठेवणे इत्यादी उपाययोजनांची कामे मान्सूनपूर्व करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना देण्यात आल्या; परंतु पावसाळा सुरू होऊन दहा दिवसांचा कालावधी उलटला असला, तरी मान्सूनपूर्व उपाययोजनांच्या कामांकडे कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मान्सूनपूर्व तयारीच्या कामांचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर येत आहे.
२५ गावे ब्लिचिंग पावडरविना!
पावसाळ्यात जलजन्य व साथीच्या रोगांचा प्रसार होणार नाही, यासाठी स्वच्छ पाणीपुरवठ्याकरिता ब्लिचिंग पावडरचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंग पावडरचा साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे; परंतु जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार मेअखेरपर्यंत जिल्ह्यातील २५ गावांत ब्लिचिंग पावडर उपलब्ध नसल्याचे आढळून आले. त्यामध्ये अकोला तालुक्यात १४, बाळापूर तालुक्यात १० आणि मूर्तिजापूर तालुक्यात १ इत्यादी २५ गावांत ब्लिचिंग पावडर उपलब्ध नसल्याचे आढळून आले.
तालुकानिहाय असे आढळले
दूषित पाण्याचे नमुने!
तालुका नमुने
अकोला १४
बार्शीटाकळी ११
अकोट ११
बाळापूर ११
पातूर ०१
मूर्तिजापूर ०१
.............................................
एकूण ४९
पावसाळ्यात जलजन्य व साथीच्या रोगांचा प्रसार होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात नाल्यांची सफाई, पाणीपुरवठा योजनांच्या जलवाहिन्यांवरील गळत्यांची दुरुस्ती आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्याकरिता ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यासंदर्भात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात उपाययोजनांच्या कामांचा आढावा लवकरच घेण्यात येणार आहे.
-सौरभ कटियार,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.