जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस, वातावरणात गारवा; अकोलेकरांना दिलासा
By रवी दामोदर | Published: June 4, 2023 05:52 PM2023-06-04T17:52:08+5:302023-06-04T17:52:20+5:30
दुपारच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या
रवी दामोदर, अकोला: बळीराजाला प्रतीक्षा असलेल्या मान्सून पूर्व पावसाने अखेर रविवार, दि. ४ जून रोजी जिल्ह्यात हजेरी लावली. गत काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा सोसणाऱ्या अकोलेकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. दुपारच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून शहरासह विदर्भाला उष्णतेच्या लाटांनी हैराण केले. शुक्रवार, शनिवारी तर जिल्ह्याचा पारा ४४ अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. हे तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. रविवारी (दि.४) दुपारी १:३० वाजतानंतर तयार झालेल्या ढगांच्या प्रभावामुळे वातावरण हलके ढगाळ होते. त्यानंतर शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत रिमझीम पाऊस पडला. ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता. हवामान खात्यानुसार, विदर्भात आता पूर्व मोसमी पावसाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
उकाड्यापासून अकोलेकरांना दिलासा
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आह. तर दुसरीके वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने बळीराजाच्यासह नागरिकांची तारांबळ उडाली होती.