जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:15 AM2021-05-31T04:15:07+5:302021-05-31T04:15:07+5:30

काही दिवसांआधी तौक्ते वादळाच्या तडाख्याने शहरात व ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर यास वादळाने आणखी धडकी भरविली; ...

Pre-monsoon rains hit the district! | जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा!

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा!

Next

काही दिवसांआधी तौक्ते वादळाच्या तडाख्याने शहरात व ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर यास वादळाने आणखी धडकी भरविली; परंतु या वादळाचा फारसा परिणाम जिल्ह्यात जाणवला नाही. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार-पाच दिवस वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला होता. शनिवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर रविवारी अकोला शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तब्बल ४५ मिनिटे झालेल्या पावसाने शहरातील काही भागात झाडे उन्मळून पडली, तर मलकापूर व कौलखेड परिसरात गारांसह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी घरांवरील पत्रेही उडाले होते. पावसाने ग्रामीण भागातही हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे.

या भागात उन्मळली झाडे!

वादळी वाऱ्यामुळे शहरातील रिंग रोड केशव नगर, पीकेव्ही कॉलनी, रणपिसे नगर, नेहरू पार्क परिसर या भागात झाडे उन्मळून पडली होती. काही ठिकाणी या झाडांमुळे रहदारीचा रस्ता बंद झाला होता. शहरातील मलकापूर भागातील बसेरा कॉलनी येथे श्री गजानन महाराज मंदिर परिसरात पिंपळ वृक्ष कोसळला.

४५ मिनिटे बरसला पाऊस

शहरात तब्बल ४५ मिनिटे पाऊस बरसला. त्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. मान्सूनपूर्व पावसासोबत सोसाट्याचा वारा सुटला. त्यामुळे अनेक दुकानांचे फलक उडून गेले. घर, दुकानासमोर सावलीसाठी लावण्यात आलेल्या हिरव्या जाळ्या तुटून पडल्या होत्या.

वीज पुरवठा खंडित

पावसासोबत सोसाट्याचा वारा सुटल्याने शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता, तर विद्युत तारांवर झाडे उन्मळून पडली. त्या ठिकाणी वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू होते.

झाडावर पडली वीज

शहरात पावसासह विजांचा कडकडाट झाला. यामध्ये रणपिसे नगरातील प्रोफेसर कॉलनीमधील अभिजित गावंडे यांच्या घरासमोरील झाडावर वीज पडली. त्यामुळे झाड उन्मळून पडले. तसेच घराचे प्लास्टर उघडले.

Web Title: Pre-monsoon rains hit the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.