अकोला जिल्ह्यात ८१० गावांमध्ये पाण्याच्या स्रोतांचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:07 PM2019-05-03T13:07:38+5:302019-05-03T13:07:46+5:30
अकोला : जिल्हा आरोग्य विभागांतर्गत एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातील पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मान्सूनपूर्व मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ८१० गावांतील स्रोतांमधील पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत.
अकोला : जिल्हा आरोग्य विभागांतर्गत एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातील पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मान्सूनपूर्व मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ८१० गावांतील स्रोतांमधील पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कितपत सुरक्षित आहेत, याची तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे मान्सूनपूर्व विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यांतर्गत एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींमध्ये पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ८१० गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. या गावांमधील तब्बल ४ हजार ९०२ पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक नमुने अकोला तालुक्यातील गावांचे घेण्यात आले आहेत.
तालुकानिहाय सर्वेक्षण
तालुका - ग्रामपंचायती - गावे - पाण्याचे स्रोत
अकोला - ९८ - १५२ - १०७१
अकोट - ८४ - १३७ - ६४१
बाळापूर - ६६ - ८६ - ४९२
बार्शीटाकळी - ८२ - ११९ - ९२६
पातूर - ५७ - ८१ - ५५५
तेल्हारा - ६२ - ९१ - ४११
मूर्तिजापूर - ८६ - १४४ - ८०६
------------------------------
एकूण - ५३५ - ८१० - ४९०२
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने घेतले असून, ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतरच ते पाणी पिण्यास किती योग्य आहे, त्यावरून पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.
- डॉ. जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.