विधानसभेत निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य; आढावा बैठकीत अरविंद सावंत यांचे सुताेवाच
By आशीष गावंडे | Published: July 15, 2024 09:00 PM2024-07-15T21:00:31+5:302024-07-15T21:00:58+5:30
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी झाली बैठक
आशिष गावंडे, अकाेला: ज्यांनी मातेसमान शिवसेना पक्षात फुट पाडली,पक्षाला संपविण्याचा प्रयत्न केला, अशा विराेधकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी आगामी विधानसभेत निवडून येणाऱ्या सक्षम उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याचे शिवसेनेचे (उध्दव सेना) खासदार तथा विदर्भाचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी खा.सावंत साेमवारी अकाेल्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी अमरावती, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा जिल्ह्याचा आढावा घेतला.
लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी विधानसभेच्या २८८ जागांची चाचपणी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यापृष्ठभूमिवर पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसाेबत खा.अरविंद सावंत यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी हॉल येथे संवाद साधला. बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, अमरावतीचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, बुलढाण्याचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, वसंतराव भोजने, यवतमाळचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, वर्धाचे जिल्हाप्रमुख आशिष पांडे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार विश्वास नांदेकर, संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, बुलढाणाचे सह संपर्कप्रमुख छगन मेहत्रे, संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, अमरावती संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, राजेंद्र गायकवाड, श्याम देशमुख, मनोज कडू, शहरप्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. लाेकसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनमत शिवसेनेच्या साेबत असल्याचे अधाेरेखित झाले असल्याचे स्पष्ट करीत विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकजुटीने कामाला लागा. यश मिळविण्यासाठी आपसातील मनभेद व मतभेद विसरा, प्रखर हिंदुत्वाचा विचार ज्वलंत ठेवण्यासाठी कामाला लागण्याचे खा.सावंत यांनी स्पष्ट केले.
.................................
तीन जिल्ह्यांचा घेतला आढावा!
खा. अरविंद सावंत यांनी साेमवारी अमरावती, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय कामगिरीचा आढावा घेतला. प्रमुख पदाधिकाऱ्यांसाेबत संवाद साधत निवडणुकीच्या रणनितीवर मंथन केले. यावेळी संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. मतदार संघात कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो? उमेदवारांची जमेची बाजू, बलस्थाने, संघटनात्मक बांधणी, कार्य करण्याच्या पध्दतीचा आढावा घेण्यात आला. मंगळवारी अकाेला व वाशिम जिल्ह्याचा आढावा घेतला जाइल.