सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:44 IST2019-07-09T18:44:10+5:302019-07-09T18:44:15+5:30
मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पुनोती येथे घडली.

सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या
सायखेड: माहेराहून कार घेण्यासाठी दोन लाख रूपये आणण्याचा तगादा, मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पुनोती येथे घडली. या प्रकरणात बार्शिटाकळी पोलिसांनी विवाहितेचा पती व सासूविरूद्ध गुन्हा दाखल केला.
बार्शिटाकळी तालुक्यातील पुनोती खुर्द येथील ज्ञानेश्वर संजय काकडे यांच्याशी मुर्तिजापूर तालुक्यातील पलसोड येथील बाबाराव वानखडे यांची मुलगी किरण हिचा १८ जून २0१८ रोजी विवाह झाला होता. ज्ञानेश्वर हा आॅटोरिक्षा चालवितो. विवाहानंतर काही महिने सुरळीत गेल्यानंतर पती ज्ञानेश्वर व सासूने माहेराहून किरणला कार घेण्यासाठी दोन लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. परंतु किरण त्याकडे र्दुलक्ष करायची. त्यामुळे पती व सासू तिचा शारिरीक व मानसिक छळ करायचे. किरण ही गर्भवती होती. पती व सासूच्या सातत्याच्या छळाला कंटाळून अखेर किरणने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर ८ जुलै रोजी पुनोती किरणच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. किरणचे वडील बाबाराव वानखडे यांच्या तक्रारीनुसार बार्शिटाकळी पोलिसांनी पती ज्ञानेश्वर काकड, सासू बबिता संजय काकड यांच्याविरूद्ध भादंवि कलम ४९८(अ), ३0४(ब) ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार तिरूपती राणे, पीएसआय ज्ञानेश्वर चव्हाण करीत आहेत. (वार्ताहर)